मंदोस चक्रीवादळाने (Cylone Mandous) शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चेन्नईजवळील ममल्लापुरम येथे पूर्व किनारपट्टी ओलंडण्यास सुरुवात केलीय. मंदोस वादळामुळे समुद्र किनाऱ्यावर वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सर्तक झाले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून येथे एनडीआरएफचे व एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. ४०० जणांच्या १२ तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या असून तामिळनाडूमध्ये शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे वादळ जमिनीवर पडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे पाच तास लागतील. यासह १२२ वर्षांत चेन्नई आणि पुद्दुचेरी दरम्यानचा किनारा ओलांडणारे मांडूस हे १३ वे चक्रीवादळ ठरलेय.
शुक्रवारी संध्याकाळी उशिरा, वाऱ्याचा वेग वाढला आणि पाऊस अचानक काही मिनिटांसाठी थांबला. “चक्रीवादळ वायव्य दिशेने तिरुवन्नमलाईच्या दिशेने प्रवास करत राहील आणि नंतर त्याची तीव्रता कमी होईल, असे प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक एस बालचंद्रन यांनी सांगितले. जमिनीवरील मार्गावर कोणतेही जोरदार वारे वाहणार नाहीत, असे ते म्हणाले.
१० डिसेंबर रोजी उत्तर तामिळनाडूच्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये, रायलसीमाचा काही भाग आणि दक्षिण कर्नाटकात पाऊस पडेल. चेन्नईसारख्या किनारपट्टीवरील जोरदार वारे शनिवारी सकाळपासून वेग कमी करतील आणि दुपारपर्यंत ओसरतील. आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोर कायम राहील.
मंदोसमुळे तामिळनाडूला फटका बसला आहे. येथे जोरदार वाऱ्यासह पाऊस तसेच कर्नाटक, केरळ मधील हवामानातील बदल झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह गुजरातमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. चक्रीवादळाचा परिणाम ११ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.