हमखास उत्पादन व उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून गेल्या काही वर्षांत या भागात विस्तारलेली हळद यंदा उत्पादकांनारडवत आहे. हळदीला गेल्या काही वर्षांतील नीचांकी दर तसेच वादळी पावसाने नुकसान झाले. त्यामुळे अनेकांना उत्पादन खर्चही भागविणे अवघड झाले आहे. याचा परिणाम येत्या हंगामात लागवडीवर होईल, असे शेतकरी सांगत आहेत.
दरवर्षी खरीप हंगामात पर्यायी पीक म्हणून हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. मागील काही वर्षे दरही समाधानकारक मिळत होते. उत्पादनातही सातत्य राहिल्याने शेतकरी इतर पिकांसोबतच हळद लागवडीकडे वळत होते. वऱ्हाडातील वाशीम जिल्हा हळद लागवडीत विदर्भात अग्रेसर झाला.
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांमध्येही या पिकाची लागवड केली जाते. यंदाच्या वर्षात हळद पिकाला मागील दोन महिन्यांतील वादळी पावसाचा फटका बसला. पीक काढणीला आले तेव्हा पाऊस झाला.
काही शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात हळदीची काढणी सुरू केली. त्याच काळात पाऊस झाला. यामुळे हळदीला वाळवता आलेले नाही. परिणामी, काहींची हळद खराब झाली. कुठे बुरशी लागण्याचेही प्रकार झाले आहेत.
चार वर्षांतील नीचांकी दर
हळदीला मागील चार वर्षांतील नीचांकी दर सध्या मिळत आहे. पाच हजारांपासून ते साडे सहा हजारांदरम्यान विक्री होत आहे. बहुतांश माल हा सहा हजारांच्या आतच विकला जात आहे. यंदा हळदीचा उतारा काही भागांत १५ क्विंटलपासून २५ क्विंटलदरम्यान लागला.
मात्र तयार झालेली हळद उकळल्यानंतर वाळवणे न जमल्याने प्रचंड नुकसान झेलावे लागले. मालाचा दर्जासुद्धा खालावला. यामुळे बाजारात ही हळद कमी दराने विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
यंदा क्षेत्र घटीची चिन्हे
कमी दर, निसर्गाचा फटका पाहता यावर्षी हळदीची लागवड किमान २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी हळदीचे बेणे मोडून टाकले. पुढील हंगामात लागवडच करायची नसल्याने काहींनी बाजूला ठेवलेले बेणेही उकळून घेतले.

