मंगळवारी रात्री 1.57 वाजता भारत, चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 पर्यंत मोजली गेली. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नेपाळला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळच्या डोटी येथे घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये बुधवारी सकाळी 6.27 वाजता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती.
भूकंपाचा केंद्रबिंदू
भारतातील नेपाळ सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढजवळ 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. यासोबतच संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये पिथौरागढपासून 90 किमी अंतरावर होता.
भारतात या ठिकाणी आला भूकंप
उत्तर प्रदेशातील लखनौ, मुरादाबाद, मेरठ बरेली आदी शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी एनसीआरच्या फरिदाबाद, गुरुग्राम, ग्रेटर नोएडा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकांनी घराबाहेर येत सुरक्षित ठिकाण गाठले. घाबरलेल्या लोकांनी एकमेकांना फोनकरून घटनेची माहिती दिली. सुदैवाने भारतात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
भूकंपामुळे नेपाळमध्ये सर्वाधिक नुकसान
भूकंपामुळे नेपाळमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. डोटी येथे भूकंपाच्या धक्क्याने एक घर कोसळले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले. डोटी येथे 6.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश आहे. भूकंपात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भारतात नुकसान नाही
गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला भूकंपग्रस्त राज्यांकडून माहिती मिळाली आहे. आतापर्यंत दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. गृह मंत्रालय सतत राज्यांच्या संपर्कात आहे.