साखर निर्यातीच्या (Sugar Export) बाबतीत साखर कारखान्यांची (Sugar Mills) निराशा होण्याची चिन्हे आहेत. कारण यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन (Sugar Production) अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे केंद्र सरकार अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी देण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीच्या मनसुब्यांवर पाणी पडण्याची शक्यता आहे, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योगक्षेत्रातील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
भारत हा ब्राझीलनंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश आहे. गेल्या हंगामात भारताने विक्रमी ११० लाख टन साखर निर्यात केली होती. परंतु एक ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झालेल्या यंदाच्या हंगामात मात्र केंद्र सरकारने केवळ ६१.५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली.
यंदाचा हंगाम सुरू होताना अन्न महागाईचा निर्देशांक वरच्या पातळीवर गेलेला होता. त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातीला लगाम लावला. केंद्र सरकारने ५ नोव्हेंबर रोजी यंदाच्या हंगामात ६१.५ लाख टन साखर निर्यातीचा निर्णय जाहीर केला.
निर्यातीसाठी प्रत्येक साखर कारखान्याला कोटा जाहीर करण्यात आला. कारखान्यांना निर्यात कोट्याची अदलाबदल करण्याचीही परवानगी देण्यात आली.
यंदाच्या हंगामात साखरेचे जादा उत्पादन होईल, असे गृहीत धरून धोरणे आखली जात होती. त्या हिशोबानेच केंद्र सरकारने साखर निर्यातीचे नियोजन केले होते.
साखर निर्यातीसाठी दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त कोटा मिळावा, यासाठी साखर उद्योगाकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. परंतु रॉयटर्स वृत्तसंस्थेने यंदा साखर उत्पादन ७ टक्के कमी राहण्याचे वृत्त डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिले होते.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखर उत्पादन घटणार असल्याने देशाचे साखर उत्पादन ३३३ लाख टनांवर येण्याची शक्यता या बातमीत वर्तविण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय साखर बाजारात खळबळ उडाली. त्यावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने खुलासा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा सव्वादोन लाख टनाने साखर उत्पादन कमी राहील, यंदा अपेक्षित साखर उत्पादन ३५७ लाख टन राहील, असे महासंघाने म्हटले होते. परंतु महासंघाने आता या अंदाजातही घट केली आहे. यंदा साखर उत्पादन ३४३ लाख टन राहील, असे आता महासंघाने स्पष्ट केले आहे.
साखर कारखान्यांनी ६१.५ लाख टन साखरेपैकी आतापर्यंत सुमारे ५६ लाख टन साखर निर्यातीचे करारमदार केलेले आहेत. केंद्र सरकार आणखी २० ते ४० लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी देईल, अशी साखर उद्योगाची अपेक्षा होती.
परंतु देशांतर्गत साखर उत्पादनाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीबद्दल निर्णय घेतला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आता साखर उत्पादन घटणार असल्याचे अंदाज येत असल्याने अतिरिक्त साखर निर्यातीची शक्यता धूसर झाली आहे.
त्यामुळे जागतिक बाजारात साखरेचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. भारताचे स्पर्धक असलेल्या ब्राझील आणि थायलंडमधून साखर निर्यात वाढू शकते.
भारत यंदाच्या हंगामात ८० ते ९० लाख टन साखर निर्यात करेल, असा साखरेच्या व्यापारातील जागतिक संस्थांचा सुरुवातीचा अंदाज होता. परंतु प्रतिकूल हवामानामुळे उद्योगाचे अंदाज कोसळून पडले.
‘‘साखर उत्पादनाबाबत उलटसुलट अंदाज येत आहेत. पुढच्या महिन्याच्या आसपास याबाबत आणखी स्पष्टता येईल. त्या वेळेस साखर उत्पादनाचे चित्र अधिक स्पष्ट होईल,’’ असे केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी नुकतेच सांगितले.
साखर उद्योगातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जे साखर कारखाने थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करतील, त्यांना अतिरिक्त ४ लाख टन साखर निर्यातीची परवानगी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता.
परंतु आता बदललेल्या परिस्थितीमुळे फेब्रुवारी महिना संपेपर्यंत तरी या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता नाही, असे त्याने सांगितले.
‘निर्यातीलाही परवानगी अशक्य’
‘‘गेल्या वर्षीपेक्षा उसाचे उत्पादन खूपच कमी राहणार आहे. अतिरिक्त साखर निर्यातीची गरज भागवण्यासाठी हे उत्पादन पुरे पडणार नाही,’’ असे निर्यातीच्या निर्णयाशी थेट संबंधित असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ‘‘साखर उद्योगाची ३० ते ४० लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीची मागणी मान्य करणे शक्य नाही. १० लाख टन (अतिरिक्त) साखर निर्यातीलाही परवानगी देणे शक्य नाही,’’ असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
भारताचे प्रमुख निर्यातदार देश
भारत हा प्रामुख्याने इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, सुदान, सोमालिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना साखरेची निर्यात करतो.