परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतील कापूस लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता (दि.१९) ऑगस्टपर्यंत ही खरेदी सुरु राहणार आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. तसंच खरेदीच्या शेवटच्या आठवड्यात देखील दरात सुधारणा झाली आहे.
शनिवारी (ता. १२) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७ हजार ४३५ ते कमाल ७ हजार ८३५ रुपये, तर सरासरी ७ हजार ८२५ रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांनी दिली. शुक्रवारी (ता.१०) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७ हजार ७२५ ते कमाल ७ हजार ८०० रुपये, तर सरासरी ७ हजार ७८० रुपये दर मिळाले.
शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक आहे. त्यामुळे लिलावाद्वारे होणाऱ्या खरेदीस बाजार समितीकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पर्यंत सेलू बाजार समितीत यंदा साडेचार लाख क्विंटलवर कापूस खरेदी झाली आहे.
दरम्यान, देशातील कापूस वायदे आजही ४०० रुपयांनी वाढले होते. वायदे ६० हजार ८४० रुपयांवर पोचले होते. बाजार समित्यांमधील भाव मात्र या स्थिर होता. कापसाला सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाच्या दरातील सुधारणा पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

