“फार्मर्स टू फार्मर्स अॅग्रीकल्चर नॉलेज एक्सटेंशन” म्हणजे काय?
“फामर्स टू फार्मस नॉलेज एक्सटेंशन”चा मराठीतील अर्थ आहे शेतकरी ते शेतकरी ज्ञान प्रसार.
कृषी ज्ञान प्रसाराचे तीन मार्ग
- विद्यापीठातील शास्त्रज्ञ ते शेतकरी
- कृषी विभाग विस्तार यंत्रणा ते शेतकरी
आणि - शेतकरी ते शेतकरी
यातील तिसरा पर्याय कृषी ज्ञान विस्तारामध्ये सर्वांत प्रभावी मानला जातो. शेतकऱ्याची भाषा शेतकऱ्याला चांगली कळते. एक प्रशिक्षित, हुशार शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला आपल्याकडचे पीकपाण्याचे ज्ञान, कौशल्य हस्तांतरीत करतो. यालाच शेतकरी ते शेतकरी ज्ञानप्रसार म्हटले जाते. शेती तंत्रज्ञान विस्तारातील प्रभावी उपकरण.
एक उदाहरण.
शेतकरी ते शेतकरी ज्ञान प्रसार चळवळीतील अग्रणी संदीपनाना कोकाटे (येवला) यांनी एक उदाहरण दिले.
ते म्हणाले, “मी प्रगतीशील युवा शेतकरी अमोल भोसेकर (नेवासा) यांच्याकडून कपाशी व्यवस्थापनाचे धडे घेत आहे, तर अमोल भोसेकर हे माझ्याकडून मका व्यवस्थापन शिकत आहेत. मी यंदा अठरा एकरात मका घेतलाय. पण पुढच्या वर्षी मक्याचे क्षेत्र कमी करून तिथे कपाशी लावणार आहे. कारण खरीप कपाशी+ रब्बी कांदा हे सूत्र जुळते. आणि अमोल भोसेकर हे कपाशीखालचे क्षेत्र कमी करून मक्याचे पीक वाढवणार आहेत. बदलत्या पाऊस पॅटर्नमुळे वरील निर्णय घ्यावा लागतोय. कारण, पारंपरिक मका उत्पादक भागात चांगली उत्पादकता मिळत नाही, तेच कपाशीबाबत घडतेय. म्हणून पीकबदलाचा कार्यक्रम हाती घेणे क्रमप्राप्त ठरते.”
“शेतकरी एखादी माहिती सांगतो, तेव्हा त्यात संभाव्य वीजपुरवठा, भांडवलाचा अभाव, मजूर टंचाई, उपलब्ध संसाधने, जमिनीचा प्रकार आदीसंदर्भात व्यवहारी आकलन असते. शिवाय, शेतकऱ्याची भाषा शेतकऱ्याला कळते, सोपी असते.”
“आज शेतकरी ते शेतकरी ज्ञान प्रसार चळवळीत अनेक युवा शेतकरी जोडले गेले आहेत. यात इंजिनिअरिंग, हॉर्टिकल्चर, बॅंकींग, आयटी आदी शाखांचे ज्ञान असलेले शेतकरी यात प्रामुख्याने सहभागी आहेत. फेसबूक, क्लबहाऊस ऑड़िओ अॅप, व्हॉट्सअप या माध्यमातून कृषी ज्ञान प्रसाराचे काम सुरू आहे. यात कुठलीही फी नाही, प्रॉडक्ट सेलिंग आदी प्रकार होत नाहीत. विशुद्ध एकमेकांना साह्य करण्याची भूमिका असते.”
शब्दांकन – दीपक चव्हाण, ता. 25 सप्टेंबर 2022.
Photo credit -the logical Indian

