राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पळो की सळो करून सोडले आहे. खरीप पिकांची काढणी सुरु असतानाच ऐन वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र सरकार चिन्हांतच व्यस्त असल्याचा आरोप करत परभणी मधील शेतकऱ्यांनी शेतात अर्धनग्न आंदोलन केले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीन आणि कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
परभणीच्या मिरखेल येथील शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या सोयाबीनच्या शेतात आंदेलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेतात पाणी साठल्याने सोयाबीन खराब झाले आहे.
यामुळे सरकारच लक्ष वेधण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी पाणी साचलेल्या शेतामध्ये अर्धनग्न होत अनोख्या प्रकारे आंदोलन केले आहे. तसेच पीक विमा आणि सरकारकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडताना सांगितले की सोयाबीनचे पूर्ण शेत जलमय झालं आहे. या कृषी प्रधान देसात शेतकरी राजा आहे, असे सांगितले जाते की शेतकरी राजा आहे. मात्र, त्याला नावाला राजा ठेवले आहे. पण त्याचा जगण्याचा पूर्ण अधिकार या प्रशासकीय व्यवस्थेने हिरावला आहे.