पुणेः चीनकडून मागणी वाढण्याचा अंदाज असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात मागील काही दिवसांपासून सुधारणा झाली. मात्र देशातील शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस विक्री कमी केल्याने देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त आहेत. भारतीय कापूस बाजाराचा आंतरराष्ट्रीय बाजारालाही आधार मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांनी गरजेप्रमाणे कापूस विक्री सुरु ठेवल्यास पुढील काळात कापूस दर वाढतील, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
देशातील कापूस दर मागील काही दिवसांपासून नरमले आहेत. नोव्हेंबरमध्ये कापसाच्या दराने सरासरी ९ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र सध्या कापूस दर सरासरी ८ हजार ७०० ते ९ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पण कापसाचे दर कमी होऊनही आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा जास्त आहेत.
देशातील कापूस दर जास्त असल्याने निर्यातीसाठी पडतळ नाही, असे निर्यातदार सांगत आहेत. बाजारातील दर पाहता ही स्थिती खरी असल्याचं दिसतं. मात्र भारतातील शेतकरी कमी भावात कापूस विकत नाहीत, यामुळे दर टिकून आहेत, असं ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी सांगितले.
कापूस विक्री निम्म्यावर
डिसेंबर महिन्याचा विचार करता भारतीय बाजारात रोज किमान दोन ते अडीच लाख गाठींची आवक होत असते. मात्र सध्या कापूस दर अपेक्षित भावपातळीपेक्षा कमी असल्याने शेतकरी खुपच कमी कापूस विक्री करत आहेत. सध्या कापूस आवक निम्म्याने घटली. दैनंदीन आवक केवळ १ लाख १० हजार ते सव्वा लाख गाठींपर्यंत होत आहे. आवक घटल्याने कापूस दरातील नरमाई थांबली
आंतरराष्ट्रीय बाजारालाही आधार
भारतीय बाजरातील आवक कमी असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा वरच्या पातळीवर दर टिकून आहेत. याचा आंतरराष्ट्रीय बाजारालाही काहीसा आधार मिळत असल्याचं काही जाणकार सांगत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजाराला चीनच्या मागणीचा आधार मिळत आहे. मात्र अप्रत्यक्षपणे भारतीय कापसातील तेजीही आंतरराष्ट्रीय बाजाराला हातभार लावत असल्याचे वैराळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या विक्रीवर दर अवलंबून
आंतरराष्ट्रीय बाजाराला चीनच्या मागणीचा आधार मिळत आहे. मात्र देशातील कापूस दर तेजीत राहण्यासाठी संतुलीत आवक खूपच महत्वाची आहे. शेतकऱ्यांनी सध्या असलेली कापूस आवक कायम ठेवल्यास बाजार टिकून राहील. उलट आवक वाढवल्यास दरात नरमाई येऊ शकते. तसेच भारतातील कमी आवक आणि चीनची मागणी वाढण्याची शक्यता यामुळे कापूस बाजाराला आधार मिळत आहे, असे शेतीमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी सांगितले.
चालू महिन्यात दर कसे राहतील?
कापूस दरात चालू महिन्यात चढ-उतार राहू शकतात. गरज असलेले शेतकरीही चालू महिन्यात कापूस विक्री करू शकतात. या परिस्थितीत उद्योग आणि व्यापारी दर कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. पण शेतकऱ्यांनी एकदम आवक वाढवली नाही तर दर टिकून राहतील. शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने कापसाची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल.
जानेवारीत दरवाढीची शक्यता
डिसेंबरमध्ये कापूस आवक जास्त होण्याची आशा आहे. त्यामुळे उद्योगही सध्या गरजेप्रमाणे खरेदी करत आहेत. मात्र या महिन्यात शेतकऱ्यांनी मर्यादीत कापूस विक्री केल्यास उद्योगांना पुढील महिन्यापासून कापूस खरेदी वाढवू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातही दरवाढीसाठी अनुकुल स्थिती आहे. त्यामुळे पुढील महिन्यात देशातील कापूस दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.