रासायनिक खतांसोबत उत्पादकांकडून होणारी लिंकिंग, एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय, त्याचबरोबर शासनाच्या होणाऱ्या आदेशाच्या उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी खत विक्रेत्यांनी आजपासून (ता. ३०) बेमुदत बंदची हाक दिली आहे.
बंदबाबतचे निवेदन बार्शी तालुका सिडस, पेस्टिसाईड्स अॅन्ड फर्टिलायझर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार सुनील शेरखाने व तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांना देण्यात आले.
या वेळी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष दिनेश सुपेकर, उपाध्यक्ष नितीन कोकाटे, सचिव शिशिर मते, खजिनदार राहुल मुंढे, पंकज लखशेट्टी, अतुल कुलकर्णी, विशाल श्रीश्रीमाळ, नीलकंठ ठोंबरे, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.
कृषी खाते व केंद्र सरकारने आदेश देऊनही उत्पादक कंपन्या खते पोच देत नाहीत. खताचे वेगळे भाडे आकारतात.
रेल्वे रॅक लागण्यापूर्वी खताची ऑर्डर असून सुद्धा रॅकमधील खत गोदामात पाठवितात. त्यानंतर विक्रेत्यांना निरोप देऊन उत्पादनास दुय्यम वाहतूक परवडत नसल्याचे सांगून एक्स खत दिले जाते.
जोपर्यंत उत्पादक लेखी स्वरूपात हमी घेऊन विक्रेते, शासन व बळीराजा याची होणारी फसवणूक बंद होत नाही. तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे निवेदनात नमूद आहे.
… विक्रेत्यांच्या मागण्या
शेती औषधे, बि-बियाणे व रासायनिक खते सीलबंद येतात. यात नमुने हे अप्रमाणितची जबाबदारी कायदानुसार उत्पादकाची असताना सुद्धा कृषी विक्रेत्यास जबाबदार धरणे चुकीचे आहे.
रेल्वे स्टेशनवरून किंवा गोदामातून उत्पादकांनी वाहतूक करारातील तरतुदींनुसार सर्व विक्रेत्यांना कमीत कमी एक प्रकारचे तीन टन खतांसोबत मिळावे असे आदेश द्यावे. त्यामुळे शेतकऱ्यांची खत खरेदीतील फरफट थांबेल, असे निवेदनात नमूद आहे.