शेतकरी बांधवांच्या हितासाठी राज्यातील काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला असून १ मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रु.२०० प्रति टनप्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे.
आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदानाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री मा.अजित पवार, महसुल मंत्री मा.बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री मा.बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत उपस्थित होतो.
राज्यात यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी बैठकीत दिले.
या बैठकीस आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री मा.विश्वजीत कदम यांच्यासह इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.