हरभरा बाजाराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून महत्वाच्या ग्राहक बाजारांत सुधारणा होताना दिसत आहे.
दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि मुंबई बाजारात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली. मार्च महिन्यापर्यंत देशात यंदा हरभरा उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
पण मार्च महिन्यात अनेक भागातील हरभरा काढणी सुरु झाली. हरभरा काढणी केलेल्या शेतकऱ्यांनी यंदा उत्पादन घटल्याचे सांगितले. महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड झाली. राज्यात २९ लाख हेक्टरवर लागवड झाली.
म्हणजेच देशातील एकूण लागवडीपैकी तब्बल २६ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. पण राज्यातील शेतकरी यंदा उत्पादकता घटल्याचे सांगत आहेत. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशातही काही भागांमध्ये उत्पादन कमी झाल्याचे वृत्त आहे.
नाफेडची खरेदीही सुरु झाली. तसेच राज्यात शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे नाफेड यंदा चांगली खरेदी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास खुल्या बाजारातील हरभऱ्याच्या दरालाही आधार मिळेल.
हरभऱ्याचे भाव खुल्या बाजारात ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

