पाथर्डी : मिरी येथील दुकानदारास दोन कडबाकुट्टी मशीन पाठवा, असे फोनवर सांगितले. पाठवलेले कडबाकुट्टी मशीन उतरून घेतले. मात्र, पैसे दिले नाही, खोटी माहिती देऊन फसवणूक केली, अशी फिर्याद नगरच्या व्यापार्याने शेवगाव येथील वडुले गावच्या व्यक्तीच्या विरोधात पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे.दत्तराज रावसाहेब अडसुरे (रा. पाईपलाईन रोड) या नगर येथील व्यापार्यांने फिर्याद दिली. ‘माझे शर्मिला ट्रेडर्स नावाचे दुकान असून, दुकाणात कडबाकुट्टी मशीन, मिल्किंग मशीन व अन्य साहित्य विकण्याचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता मोबाईलवर फोन आला. मिरी येथून बोलत असून, माझे मिरीत ‘विघ्नेश्वर ट्रेडींग’नावाचे दुकान आहे. मला कडबाकुट्टीच्या पाच मशनेरी पाहिजेत. त्या मला मिरी येथे पाठवून द्या, मी तेथे तुमचे पैसे देतो,’ असे सांगितले.
टेम्पोमध्ये पाच कडबकुट्टी मशीन भरून चालकाकडे सदर मोबाईलनंबर देऊन मिरी येथे पाठवले. चालकाने त्या व्यक्तीला फोन लावला. त्याचे सांगण्यावरून चार कडबाकुट्टी मशीन सायंकाळी पाच वाजता मिरी येथे अनोळखी लोकांनी पिकप टेम्पोमध्येे उतरून घेतल्या. एक कडबाकुटी मशीन माका तालुका नेवासा येथे घेऊन येण्याचे सांगितले. माका येथे एक मशीन उतरून घेतो व सर्व पैसे देतो, असे फोनवर सांगितले. टेम्पोपो चालक एक मशीन घेऊन माका येथे गेला; मात्र तेथे कोणीच आले नाही. फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्या व्यक्तीचा शोध घेतला असता, त्याचे नाव दीपक गणेश गुगळे (रा. वडुले, ता. शेवगाव), असल्याचे समजले अशी फिर्यादीत म्हटले आहे. अडसुरे यांच्या फिर्यादीवरून गुगळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.