देशातील गहू उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोहोचल्याचा अंदाज केंद्र सरकारने जाहीर केला. पण तरीही भारतीय अन्न महामंडळाला (एफसीआय) केवळ २६२ लाख टनांची खरेदी करता आली. तर खुल्या बाजारात मागील महिनाभरात गव्हाच्या भावात ८ टक्क्यांची वाढ झाली.
गहू काढणी हंगाम संपून काही महिनेच झाले आहेत. मात्र निवडणुकांच्या तोंडावर गव्हाचे भाव वाढल्यास सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने शेवटी गव्हावर स्टॉक लिमिट लावले. मागील आठवड्यात तूर आणि उडदावर स्टॉक लिमिट लावल्यानंतर गव्हावर स्टॉक लिमिट लावले आहे.
गेल्या हंगामात देशातील गव्हाचे उत्पादन घटले होते. तर निर्यातही चांगली झाली होती. परिणामी, खुल्या बाजारात गव्हाचे तेजीत आले होते. सरकारने खुल्या बाजारात गव्हाची विक्री करून दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता.
रब्बीतील गहू बाजारात यायच्या आधी गव्हाचे भाव हमीभावाच्या दरम्यान आले होते. त्यातच सरकारने यंदा देशात विक्रमी १ हजार १२७ लाख टन गहू उत्पादन झाल्याचे सांगितले. तसेच यंदा ३४१ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट जाहीर केले.
गेल्या हंगामात केवळ १८८ लाख टनांचीच खरेदी करता आली होती. यंदा उत्पादन वाढल्याने खरेदीचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला. पण मार्चनंतर खुल्या बाजारात गव्हाचे भाव वाढल्यानंतर सरकारची खरेदी कमी झाली. तर खुल्या बाजारात दरातील वाढ कायम आहे.

