राज्यात आज पावसाचा जोर कमी दिसला. अनेक भागांमध्ये दुपारपर्यंत पावसाने उघडीपर दिली होती. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. हवामान भागाने राज्यातील काही भागांमध्ये आजही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.
राज्याच्या अनेक भागात आज पावसाचा जोर कमी होता. कोकण, मध्य महाराष्ट्राचा गाटमाथा, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील काही भागांमध्ये आजही जोरदार सरी पडल्या. तर अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पण बहुतांशी भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम होते.
अधून मधून पावसाची भूरभूरही सुरु होती. पावसाचा जोर कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांनी आंतरमशागतीच्या कामांना गती दिली. पूर आलेल्या अनेक नद्यांची पाणीपातळीही कमी झाली होती.
माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आज दिसा, इंदोर, दामोह, पेंड्रा रोड, गोपालपूर भागात आहे. हा कमी दाबाचा पट्टा समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर आहे. मध्य प्रदेशच्या मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर ते ५.८ किलोमीटर उंचीवर ईशान्य मध्य प्रदेशपर्यंत विस्तारलेली आहे.
दरम्यान हवामान विभागाने आजही अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रागयड आणि ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.
तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या गाट माथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर तसेच खानदेशातील जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तविला आहे. संपूर्ण विदर्भातही आज येलो अलर्ट देण्यात आला. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.