देशातील फळे आणि भाजीपाला उत्पादनात यंदा जवळपास ४० लाख टनाने वाढ झाली. २०२२-२३ मध्ये देशातील फळे आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन ३ हजार ५०८ लाख टनांवर पोचले.
यंदा देशात कांदा आणि टोमॅटो उत्पादन घटले, तर बटाटा उत्पादनात मोठी वाढ झाली, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने पहिल्या फलोत्पादन अंदाजात म्हटले आहे. या उत्पादन वाढीसाठी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि सरकारी धोरणांना श्रेय दिले.
कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील भाजीपाला आणि फळ पिकांखालील लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. २०२२-२३ च्या हंगामात देशात २८३ लाख हेक्टरवर लागवड होती. गेल्या हंगामात हेच क्षेत्र २८० लाख हेक्टर लागवडी खाली होते. देशात यंदा एकूण भाजीपाला उत्पादनात जवळपास १.६ टक्क्यांनी वाढ झाली.
यात बटाटा उत्पादनात वाढ झाली असून टोमॅटो आणि कांदा उत्पादनात घड झाली आहे. देशात २ हजार १२३ लाख टन भाजीपाला उत्पादन झाले. म्हणजेच ३४ लाख टनांची वाढ झाली. गेल्या हंगामात २ हजार ९१ लाख टन उत्पादन झाले होते. (Horticulture Production)
गेल्या हंगामात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली, असे सरकारने म्हटले होते. जाणकारांच्या मते, मागील हंगामात सरकारच्या पहिल्या आणि शेवटच्या अंदाजात फारसा फरक पडला नव्हता. त्यामुळे यंदाही असाच अनुभव येऊ शकतो.
यंदा देशातील भाजीपाला पिकांच्या उत्पादनात १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर फळ उत्पादनातही काहीशी वाढ झाली. यंदा फळ उत्पादन १ हजार ७७ लाख टनांवर पोचले. तर गेल्या हंगामातील उत्पादन १ हजार ७५ लाख टनांवर होते.
कांदा टोमॅटो उत्पादन घटले
देशात यंदा ३११ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या हंगामात ३१७ लाख टन उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदा कांदा उत्पादन २ टक्क्यांनी घटले. तर टोमॅटो उत्पादनात किंचित घट झाली.
गेल्या हंगामात देशात २०७ लाख टन टोमॅटो उत्पादन होते. ते यंदा २०६ लाख टनांवर पोचले. बटाटा उत्पादनात मात्र यंदा तब्बल ६.३ टक्क्यांनी वाढ झाली. यंदा उत्पादन ५९७ लाख टनांवर पोचले. गेल्या हंगामात बटाटा उत्पादन ५६२ लाख टनांवर स्थिरावले होते.