सरकारने स्टाॅक लिमिट लावले तरी तुरीचे भाव तेजीतच आहेत. मागील पाच महिन्यात तुरीच्या भावात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. देशात उत्पादनच कमी असल्याने भाव तेजीत आले, असे व्यापारी आणि प्रक्रियादार सांगतात. सरकारला मात्र वेगळाचं संशय आहे. व्यापारी आणि आयातदार बाजारातील पुरवठा कमी करून भाव वाढत आहेत, अशी शंका सरकारला आहे.
केंद्र सरकारने तुरीवर २ जून रोजी स्टाॅक लिमिट लावले. तुरीचे भाव काही बाजारांमध्ये ११ हजारांवर पोचल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला. ३१ ऑक्टोबरपर्यंत स्टाॅक लिमिट असेल.
घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि मोठ्या रिटेल चेन्स, प्रक्रिया उद्योग तेसच आयातदारांना स्टाॅकचे लिमिट ठरवून दिले. केंद्राने स्टाॅक लिमिट लावल्यानंतर तूर डाळीच्या भावात क्विंटलमागं २०० रुपयांची नरमाई आली. पण तुरीच्या भावात जास्त फरक दिसला नाही.
तुरीचा सरासरी भाव सध्या १० हजारांच्या दरम्यान आहे. तर अनेक बाजारांमध्ये तूर डाळीचे भाव १५० रुपये प्रतिकिलोवर पोचले. तुरीचा भाव पुढील तीन ते चार महिने तेजीतच राहण्याचा अंदाज आहे. कारण देशातील तूर तर नोव्हेंबरपासून सुरु होईल.
पण आफ्रिकेतील देशांमधून आयात करायची म्हटलं तरी सप्टेंबर उजाडावा लागेल. आयात होईपर्यंत तूर तेजीतच राहील. उत्पादनच कमी राहिल्याने काहीही करता येत नाही. स्टाॅक लिमिटचाही फायदा होताना दिसत नाही, असे प्रक्रियादारांनी सांगितले.
तुरीच्या भावाने १० हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर ७ ते ८ हजारांच्या दरम्या स्टाॅकिस्टनी खरेदी केलेला माल बाजारात येत आहे, असेही व्यापारी सांगत आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांनी यंदा ८ हजारांच्या दरम्यानच तूर विकली. सध्या खूपच कमी शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. परिणामी मोठा तुटवडा दिसतो. त्यामुळे तुरीचे भाव १० हजार रुपयांपेक्षा जास्तच राहण्याचा अंदाज आहे.
सरकारचा दबाव
एप्रिल महिन्यात सरकारच्या पोर्टलवर तुरीच्या साठ्याची माहिती जास्त आली. म्हणजेच सरकारकडे बऱ्याच प्रमाणातील तुरीची माहिती आली नाही. हा माल, शेतकरी, बाजार समित्या, वाहतूक आणि बंदरांवरील प्रक्रियेत अडकला होता.
हे आढळून आल्यानंतर केंद्राने राज्य सरकारांना चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे बाजारावर सरकारचा दबाव कायम आहे. तरीही तूर कमी होण्याचं नावचं घेईना.
२०१६ ची पुनरावृत्ती?
देशात सध्या तुरीची आयात कमी होत आहे. तसेच आयात मालाचे भावही वाढले. यामुळे आयातदार इतर देशांमध्ये तुरीचा स्टाॅक ठेवत असल्याचं सरकारनं म्हटलं. २०१६ मध्ये याचा अनुभव आला होता. यंदाप्रमाणं २०१६ मध्येही तुरीच्या भावात मोठी वाढ झाली होती.
त्यावेळी व्यापारी आणि आयातदारांनी एकत्र येऊन अनैसर्गिक तुटवडा निर्माण केला, असं म्हटलं जात होतं. व्यापारी आणि आयातदारांचे कार्टेल देशभरात तयार होऊन बाजारातील पुरवठा मर्यादीत केला. म्यानमार आणि आफ्रिकेतील तूर खेरदी करून इतर देशांतील बंदरांवर ठेवण्यात आला होता.
म्यानमारमधून शिंगापूरमध्ये साठवण्यात आला होता. तर आफ्रिकेतील पुरवठ्यात उशीर केला जात होता. यातून बाजारात तुरीचा तुटवडा निर्माण दर वाढवले होते. यंदाही असचं होत असल्याची शंका सरकारने व्यक्त केली आहे.