सध्याच्या काळात थंड वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी गोठ्याच्या चारही बाजूंनी आच्छादन करावे. पत्र्याच्या छतावर वाळलेले गवत अथवा कडब्याचा थर पसरावा. गोठ्यातील जमिनीवर वाळलेल्या चाऱ्याचा थर अंथरावा. अशक्त व आजारी जनावरांचे स्वतंत्र व्यवस्थापन ठेवावे. थंडीच्या काळात त्यांचे अंग बारदानाने झाकावे. जनावरांना उबदार निवाऱ्यात ठेवावे.
१) जनावरांना ओलाव्यापासून दूर ठेवावे. उष्णतेसाठी शेकोटी पेटविली असेल, तर त्यापासून निघणाऱ्या धुरापासून त्यांचा बचाव करावा. ओलसरपणा आणि धूर यामुळे जनावरांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.
२) जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी खाद्यामधून पेंड व गूळ द्यावा. उच्च दर्जाच्या चारा व पशुखाद्याचा मुबलक साठा असावा. सुधारित पशुपोषण पद्धतीने पूरक खाद्य वापरावेत. जनावरांना जंतनाशके द्यावीत.
३) जनावरांचा बाह्यपरजीवी कीटकांपासून बचाव करण्यासाठी गोठ्याची स्वच्छता ठेवावी. निरगुडी, तुळस, लेमन ग्रास यांच्या जुड्या गोठ्यात लटकवाव्यात. त्या वासाने बाह्य परजीवी कीटक गोठ्यात येण्याची शक्यता कमी होते. गोठा स्वच्छतेसाठी कडुनिंबाचे तेल असलेले द्रावण निर्जंतुकीकरणासाठी वापरता येईल.
४) जनावरांना लाळ्या खुरकूत, घटसर्प, फऱ्या, पीपीआर, आंत्रविषार नियंत्रणासाठी लसीकरण करावे.
५) पशुखाद्य आणि पाण्यातून पुरेसे क्षार पुरवावेत. दुभत्या जनावरांना संतुलित आहार, पूरक स्निग्ध खाद्य पुरवावे. सहा महिन्यांपुढील गर्भधारणा असलेल्या गाई, म्हशींना वाढीव खाद्य द्यावे.
६) पाणी पिण्याची भांडी स्वच्छ असावीत. थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना चार वेळेस कोमट पाणी पिण्यास द्यावे
७) सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तत्काळ उपचार करावेत. दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
८) बहुवर्षीय चारा पिकांची वाढ अति थंडीमुळे हळूहळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.
९) संध्याकाळचा चारा सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान द्यावा, कारण दिलेल्या आहाराचे चयापचय होऊन ऊर्जानिर्मितीसाठी कमीत कमी सहा ते आठ तास लागतात.
म्हणजेच तयार होणारी ऊर्जा त्यांच्या तापमान नियमानासाठी रात्री थंडीच्या काळात दोन ते सकाळी सहाच्या दरम्यान वापरता येईल. कारण या वेळी थंडीचा ताण जास्त प्रमाणात पाहावयास मिळतो.हिवाळ्यात जनावरांना जास्त खाद्य देणे गरजेचे असते, त्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया वाढते. शरीरात अधिक ऊर्जा उष्णता निर्माण होऊन शरीराचे तापमान नियमित ठेवले जाते.
१०) मृत जनावरांच्या विल्हेवाटीची जागा ही सार्वजनिक जागा, पाणवठ्यापासून दूर असावी. ही जागा काटेरी कुंपणाने संरक्षित असावी. तेथे फलक लावण्यात यावा.
शेळ्या मेंढ्यांचे व्यवस्थापन ः
१) स्थलांतर करणाऱ्या, रानात शेळी-मेंढी बसविणाऱ्या पशुपालकांनी विशेष खबरदारी घ्यावी.शेळी, मेंढीस बंदिस्त उबदार निवारा मिळेल याची दक्षता घ्यावी.या काळात मेंढ्यांची लोकर कापणी थांबवावी.
२) शेळ्या, मेंढ्यांना रानात बसवले असेल तर उबदार आच्छादने पांघरावीत.
३) शरीरात लवकर ऊर्जा निर्माण होण्यासाठी कर्बोदके युक्त खाद्य प्राधान्याने देण्यात यावे. परंतु अॅसिडॉसिस होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
४) वेळापत्रकानुसार लसीकरण करावे. आवश्यक औषधे आणि जीवनसत्त्वांचा साठा ठेवावा.
कोंबड्यांचे व्यवस्थापन ः
१) शेडच्या दोन्ही बाजूंच्या जाळ्यांना पडदे लावून रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावे. उन्हाच्या वेळी / दुपारी पडदे उघडावेत. शेडमध्ये तापमान नियंत्रणाची सोय असावी.
२) शेडमधील तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस नियंत्रित राहणे आवश्यक असते. त्यामुळे शेडमध्ये बल्ब, शेगडी किंवा ब्रूडरचा वापर करावा.
३) तापमान बदलामुळे कोंबड्यांवर ताण येऊ नये म्हणून त्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वांचा वापर करावा.
४) अति थंडी मुळे हवेतील आर्द्रता वाढून लिटर, खाद्यामध्ये बुरशीची वाढ होऊन कोंबड्यांना श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेडमधील लिटर स्वच्छ व कोरडे राहील याची खबरदारी घ्यावी.
५) पिण्यासाठी कोमट पाणी पुरवावे. ऊर्जेची गरज वाढल्यामुळे आवश्यकतेनुसार पोषण खाद्य तयार करून यावे.
६) वेळापत्रकानुसार लसीकरण करावे. पुरेशा प्रमाणात औषधे, क्षार मिश्रणे आणि जीवनसत्त्वांचा साठा ठेवावा.