सोयातेलाचे भाव सध्या दबावात असल्यानं सोयाबीन दराला सोयापेंडकडूनच आधार मिळतोय. सोयापेंडची निर्यात वाढल्यामुळं मागील काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली.
देशातून फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये ५ लाख टन सोयापेंड निर्यात होऊ शकते. तर खाद्यतेलाचेही दर वाढू शकतात. त्यामुळं सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीनचे दर मुख्यतः सोयापेंड आणि सोयातेलावर अवलंबून असतात. मात्र सध्या सोयातेलासह पामतेलाचे भावही दबावात आहेत. मात्र सोयापेंड निर्यात यंदा वाढली. त्याचाच आधार सध्या सोयाबीन बाजाराला मिळतोय.
यंदा देशातून सोयापेंड निर्यात वाढणं गरजेचं आहे. कारण यंदा यंदाचं सोयाबीन उत्पादन आणि मागील हंगामातील शिल्लक सोयाबीनचंही गाळप होणार आहे. म्हणजेच यंदा सोयापेंड उत्पादन जास्त राहू शकतं, असा अंदाज उद्योगांच्या पातळीवरून व्यक्त केला जात आहे.
जगातील सर्वात मोठ्या सोयापेंड निर्यातदार अर्जेंटीनात यंदा दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळं येथील सोयाबीन उत्पादन ३८० लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. यापुर्वीचा अंदाज ४८० लाख टनांचा होता.
अर्जेंटीनातून सोयापेंड निर्यात कमी राहण्याचा अंदाज असल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले. त्यामुळं भारतीय सोयापेंडला मागणी वाढली.
देशातून सध्या सोयापेंडची निर्यात चांगली सुरु आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांमधील सोयापेंड निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ६५ टक्क्यांनी वाढली. देशातून ६ लाख ३१ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. मागील पूर्ण हंगामात ६ लाख ४४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती.
निर्यात चांगली राहणार
फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये देशातून ५ लाख टन सोयापेंड निर्यात होऊ शकते, अशी माहिती निर्यातदारांनी दिल्याचे वृत्त राॅयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. सोयापेंड निर्यातीची ही गती एप्रिलपर्यंतही कायम राहू शकते.
भारतीय सोयापेंड स्वस्त
सध्या बांगलादेश, व्हिएतनाम आणि नेपाळ या देशांना भारतीय सोयापेंड स्वस्त पडत आहे. त्यामुळं या देशांकडून सोयापेंडला मागणी वाढली.
भारतीय सोयापेंड सध्या या देशांना ५८० ते ५८५ डाॅलर प्रतिटनाने मिळत आहे. तर अर्जेंटीनाची सोयापेंड ५९५ डाॅलर प्रतिटनाने पडते. शिवाय भारताकडून आयात केल्यास वाहतूक खर्चही वाचतो.
सोयापेंड आणि सोयातेलाचा आधार मिळेल
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे सध्याचे दर टिकून राहिल्यास भारतातूनही निर्यात वाढेल. भारत २० लाख टनांपेक्षाही जास्त सोयापेंड निर्यात करू शकतो, असा अंदाज काही निर्यातदारांनी व्यक्त केला.
तर दुसरीकडं इंडोनेशियाच्या धोरणामुळं पामतेलाचे दर काहीसे वाढले आहेत. पामतेलाच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोयातेलालाही आधार मिळेल.
दर वाढण्याचा अंदाज
एकूणच काय तर सोयाबीनला सोयापेंड आणि सोयातेलाकडून आधार मिळू शकतो. सोयापेंड निर्यात पुढील दोन महिने चांगली राहील आणि खाद्यतेलाचेही दर सुधारण्याचा अंदाज आहे.
त्यामुळे पुढील १५ दिवसांमध्ये सोयाबीनच्या सध्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.
या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच टप्प्याटप्यानं सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

