खऱीपातील मका पिकाची वाढ असमान आहे. मुक्ताईनगर, भोकरदन, येवला, सटाणा येथून शेतकऱ्यांचे फोन आले. त्यानुसार, 30 टक्क्यापर्यंत उत्पादकता घटू शकते. मुक्ताईनगर येथे कमी पावसामुळे पिकाची वाढ नीट झाली नाही. भोकरदन, येवला आणि सटाणा येथे अतिपाऊस व सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पीक पोषणात अडथळे आले.
चालू वर्षांत मक्याला उच्चांकी भाव मिळाला आहे. येत्या दिवाळीत सुद्धा हंगामाची सुरवात किफायती दराने अपेक्षित आहे. दरम्यान, चालू लेट खरीपात किंवा अर्ली रब्बीसाठीही मका पेरणीचा निर्णय योग्य ठरू शकतो. कारण, सप्लाय शॉर्टेज सध्या आहेच, पण पुढेही खरीपाचा सप्लाय (उत्पादकता घटीमुळे) मर्यादित राहू शकतो. आणि उत्तर भारतात दुष्काळी स्थितीमुळे 2023 मधील रब्बी\उन्हाळ पिकाबाबत प्रश्नचिन्ह आहे. जागतिक बाजारातील स्थिती देखिल किफायती रेट मिळण्याबाबत पुरक आहे. रुपयाचे घटते मूल्य निर्यातवाढीला पुरक ठरले आहे.
वाढत्या पाऊसमानामुळे मका हे पिक खरीपापेक्षा रब्बीत अधिक चांगले येतेय, असे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. अर्थात, लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेवून नियोजन क्रमप्राप्त ठरेल.
– दीपक चव्हाण, ता. 20 ऑगस्ट 2022.