गेल्या काही दिवसांपासून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. आता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत इंधनांच्या दरात झालेली वाढ, पशुखाद्यांचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना मदत करण्याच्या हेतूने संघाने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दूध संघाच्या चेअरमन केशरताई पवार यांनी दिली.
असे असताना म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ न करता विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे दर 1 फेब्रुवारीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
याआधी कात्रज दूध संघाकडून गायीच फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाचा खरेदी दरलिटरला 35 रुपये होता. तो दोन रुपयांनी वाढवून 37 रुपये करण्यात आला आहे. शेतकर्यांना वाजवी दर देताना ग्राहकांवर दूध दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे.
दरम्यान, डेअर्यांकडे संकलन वाढल्याने संघाचे दूध संकलन घटू लागले. त्यामुळे दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कात्रज दूध संघाचे रोजचे दूध संकलन देखील कमी झाले आहे.