मकरसंक्रांतीच्या सणामुळे भाज्यांच्या तोडणीसाठी कामगारही उपलब्ध नसल्याने बाजारात भेंडी, वांगी आणि फ्लॉवरची आवक घटली आहे. परिणामी दरात वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी, चिंचवड व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये भेंडी 65 क्विंटल, फ्लॉवर 144 क्विंटल आणि वांगीची आवक 23 क्विंटल एवढी आवक झाली असून, गेल्या आठवड्यापेक्षा फ्लॉवर 149, वांगी 54, तर भेंडीची 13 क्विंटलने आवक घटली आहे.
परिणामी घाऊक बाजारात फ्लॉवर 12, वांगी 40 व भेंडी 35 रूपये किलो दराने विक्री झाली आहे. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. मोशी उपबाजारात कांदा 548, बटाटा 353, लसूण 100, काकडी 67 तर टोमॅटोची 371 क्विंटल एवढी आवक झाली आहे. पालेभाज्यांच्या 36200 गड्ड्यांची, तर फळे 194 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 2572 क्विंटल
एवढी झाली.
मकरसंक्रातीचे महिला वर्गासाठी विशेष महत्व असल्याने या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतात तोडणीच्या कामासाठी लागणार्या महिला कामगार उपलब्ध न झाल्याने शेतात पिकांची तोडणीचे काम मंदावले आहे; मात्र संक्रांतीसाठी सर्व भाज्यांची आवश्यकता असल्याने मागणी वाढलेली असताना आवक मात्र घटली आहे. परिणामी बाजारात भाजी पाल्यांच्या दरात वाढ झालेली आहे.