पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा भाताच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निर्यातबंदी किंवा निर्यातीवर बंधने घालण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे.
भारताची गणना जगात सर्वाधिक तांदूळ पिकवणाऱ्या देशांमध्ये केली जाते. दीडशेहून अधिक देशांना भारत तांदूळ निर्यात करतो. भारताने २०२१ मध्ये तांदूळ निर्यातीचा विक्रम केला. २०२१ मध्ये भारताने २१.५ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला. जगातील सर्वात मोठे धान्य निर्यातदार थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या एकत्रित निर्यातीपेक्षाही ती जास्त होती.
भारत तांदळाच्या निर्यातीवर बंदी (Rice Export Ban) घालणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वाढत्या महागाईला (Inflation) तोंड देण्यासाठी सरकार गहू निर्यातबंदीनंतर (Wheat Export Ban) आता तांदळाच्या मागे लागण्याची शक्यता आहे.
यंदाही भारतीय तांदळाला निर्यातीसाठी मोठी मागणी आहे. भारत तांदूळ निर्यातीवर बंदी घालेल, या भीतीने बांगलादेशने यंदा तांदूळ आयातीची घाई केली आहे. बांगलादेशने तांदळावरील आयातशुल्क ६२.५ टक्क्यांवरुन २५ टक्क्यांपर्यंत खाली आणले. त्यामुळे तांदळाचे दर सध्या वाढले आहेत.

