धुळे येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या तीन-चार दिवसांपासून कांद्याची मोठी आवक सुरू आहे. सरासरी सोळाशे ते दोन हजार रुपये व सरासरी १५०० रुपये प्रतिक्विंटल (Onion Rate) असा मिळत आहे.
प्रतिकूल हवामानामुळे कांद्याचे नुकसान होते. चाळीमध्ये साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागला आहे. तसेच ढगाळ वातावरण आणि मध्येच झालेल्या पावसामुळे कांदाचाळीमध्ये खराब होत आहे. त्यात कांदा सडू लागला असल्याने बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी (ता. १६) लिलावात क्रमांक एकच्या कांद्यास दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
मध्यम कांद्यास एक हजार सहाशे ते एक हजार आठशे, जोडकांद्यास एक हजार तीनशे ते दीड हजाराचा दर मिळाला. पहाटेपासून टेम्पो, ट्रॅक्टर, रिक्षांनी कांद्याची आवक सुरू झाल्याचे दिसून आले. कांद्याच्या दरात अजूनही अपेक्षित वाढ नसल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करत आहेत. साक्री तालुक्यातूनही येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. शेतकरी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणत आहेत.