हरभरा हे रब्बी हंगामात मुख्य डाळवर्गीय पीक असून मराठवाडा विभागात यावर्षी मोठ्या प्रमाणावर हरभरा प्रक्षेत्र वाढलेले आहे. हरभरा पिकावरील किडीचे नुकसान कमी करण्यासाठी व पीक संरक्षण खर्च कमी करुन उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हरभरा पिकाच्या यशस्वी उत्पादनातील सर्वात मोठी अडचण म्हणजे घाटे अळी (Helicoverpa armigera) हे शास्त्रीय नाव असून Noctuidae या कुळातील आहे घाटे अळी हि बहुभक्षीय किड असून ती १८१ पेक्षा अधिक पिकावर आपला जीवनक्रम पुर्ण करते तिला अमेरिकन बोंड अळी, शेंगा पोखणारी अळी व घाटे अळी अश्या विविध नावाने संबोधतात.
जीवनक्रम:
घाटे अळीच्या प्रामुख्याने जीवनाच्या अंडी, अळी, कोष, आणि पतंग या चार अवस्था असतात त्यातील अळी अवस्था खूप नुकसानकारक असतें. मादी पतंग साधारणपणे २५०- ५०० गोलाकार आकाराचे हिरवट पिवळसर अंडी पानावर, कळीवर व फुलावर एक एक घातली जातात. ५ ते ६ दिवसांत या अंड्यातून अळी बाहेर पडते. अळीचा रंग हिरवट असून रंग हा खाणाऱ्या पिकानुसार बदलतो.१४-२० दिवसांत अळीची वाढ पूर्ण होते. त्यानंतर पिकाच्या जवळ जमिनीत तिचा कोष अवस्थेचा काळ हा एक आठवडा ते एक महिन्यापर्यंत असू शकतो, अश्या प्रकारे तिच्या ७ ते ८ पिढ्या एका वर्षात पूर्ण होतात
नुकसानीचा प्रकार :
हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते मार्च महिन्यापर्यंत दिसून येतो. हवेतील आद्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश या बाबी किडींच्या प्रादुर्भावास पोषक ठरतात.लहान अळी पानावरील हरितद्रव्य खाते त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसतात व मोठी अळी हि कळी, फुले आणि घाट्यावर खाते. एक अळी साधारणपणे ३०- ४० घाटे खाते “अळीचे अर्धे शरीर घाट्यामध्ये तर अर्धे शरीर बाहेर ”हे तिचे महत्त्वपूर्ण वैशिष्टे आहेत. या अळीमुळे ३५ ते ४० % नुकसान दिसून येते.
एकात्मिक किड व्यवस्थापन
१) उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करावी यामुळे कोष अवस्थेतील किडी सूर्यप्रकाशामुळे किंवा किटकभक्षी पक्षांमुळे नष्ट होतात.
२) पिकाची पेरणी योग्य वेळी योग्य अंतरावर करावी
3) पेरणीच्या वेळी मका किंवा ज्वारी चे बियाणे मिसळून टाकावे म्हणजे ते पक्षी थांबे म्हणून काम करते.
४) पिक ३० ते ४५ दिवसाचे असताना आंतरमशागत व कोळपणी करुन घ्यावी.
५)आंतर मशागत करुन उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी हि तण वेळोवेळी काढून टाकावी.
६) शेतामध्ये एकरी २०- २५ पक्षी थांबे लावावेत.
७) घाटे अळीच्या नियंत्रणासाठी एकरी ५- ६ कामगंध सापळे लावावेत.
८) मुख्य पिकाभोवती एक ओळ झेंडूची लावावी जेणे करुन किडी त्याच्याकडे आकर्षित होतील.
९) मोठया अळ्या असतील तर वेचून नष्ट कराव्यात
१०) पीक कळी अवस्थेत असताना अझडीरक्टीन ००.०३ डब्लू, एस. पी (३०० पी.पी.एम) ची फवारणी करावी.
११) घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही. (५०० एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे वापरावे.
१०) किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी ( १ ते २ अळ्या प्रति एका मिटर ओळीत किंवा ८-१० पतंग प्रति एक कामगंध सापळा ) ओलांडल्यानंतर खालील पैकी कोणत्याही एका रासायनिक कीटकनाशकाची फवारणी १० लिटर पाण्यात मिसळून नॅपसॅक पंपाने करावी व पॉवर पंपाने करावयाची असल्यास कीटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ०.५% एस .जी ४.४ ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एस.सी प्रति ३ मिली किंवा इन्डोक्साकार्ब १५.८० ई. सी ६.६६ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी प्रति २० मिलि किंवा थिओडिकार्ब ७५% डब्लू. पी १६.६६ मिली
( सर्व कीटकनाशक हे लेबल क्लेम नुसार आहेत)
लेखक : प्रा.अमोल ढोरमारे
प्रा. विजय शिंदे
प्रा. विशाल सोमवंशी
( सहायक प्राध्यापक कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी (तांडा) उदगीर)