मराठवाड्यात सद्यस्थितीत तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी, शेंगा वरील ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे
१) शेंगा पोखरणारी अळी : ही बहुभक्षी कीड असून अनेक प्रकारच्या वनस्पतींवर आपली उपजीविका करते.किडीची मादी पतंग तुरीच्या कळया, फुले व शेंगा यावर अंडी घालते अंडयातून निघालेल्या अळया तूरीच्या कळया आणि फुले खाऊन नुकसान करतात पुर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मि लांब पोपटी रंगाची असून पाठीवर करडया रंगाच्या रेषा असतात मोठया अळया शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. शेंगा पोखरणारी अळी साधारणपणे ७ ते १६ शेंगाचे नुकसान करते. अळी तिचे अर्धे शरीर शेंगे मध्ये तर अर्धे शरीर बाहेर खुपसून त्यातील दाणे खाते. डिसेंबर व जानेवारी मध्ये ढगाळ वातावरण असल्यास प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो.
२) ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी : (Maruca vitrata) ही कडधान्य पिकावरील ठिपक्यांची शेंगा पोखरणारी कीड आहे. या किडीचा पतंग करडया रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे दिसून येतात.मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढऱ्या रंगाची व अर्ध पारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या आढळतात.अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळीचे झुपके करून त्यामध्ये राहून कळ्या, फुले, शेंगा खाते.या किडीचा जीवनक्रम १८ ते ३५ दिवसात पूर्ण होतो.
३) तुरीवरील ढेकूण: प्रौढ पिल्ले पाने, कळ्या, फुलातील रस शोषून घेतात. रस शोषून घेतल्यामुळे शेंगा वाळून जातात. प्रादुर्भाव ग्रस्त शेंगातील दाण्याची प्रत खराब होते.
एकात्मिक किड व्यवस्थापन
१) उन्हाळ्यात खोलून नांगरणी करावी यामुळे कोष अवस्थेतील किडी नष्ट होतात.
२) तूरीमध्ये ९० दिवसापर्यंत आंतर मशागत करुन उदा. कोळशी, रानभेंडी, पेटारी हि तण वेळोवेळी काढून टाकावी.
३) शेतामध्ये एकरी १०- १५ पक्षी थांबे लावावेत.
४) तुरीमध्ये शेंगा पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी एकरी ५- ६ कामगंध सापळे लावावेत.
५) पीक कळी अवस्थेत असताना अझाडीरिक्टिन ००.०३ डब्लू, एस. पी (३०० पी.पी.एम) ची फवारणी करावी.
६) तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही. (500 एल.ई.) विषाणूजन्य कीटकनाशकाची 10 मि.लि. प्रति 10लिटर पाणी प्रमाणे वापरावे.
७) किडीनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा.
तुरिवरील ढेकुनाच्या प्रभावी नियंत्रणासाठी डायमेथोयट ३० ई. सी प्रति १० मिली १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
तुरीच्या शेंगा पोखरणारी अळीच्या व टिपक्याच्या शेंगा पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ०.५% एस .जी ४.४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किँवा क्लोरँट्रेनिलीप्रोल 18.5% एससी प्रति ३ मिली प्रती १०लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. किँवा इन्डोक्साकार्ब १४.५. एस. सी ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
( सर्व कीटकनाशक हे लेबल क्लेम नुसार आहेत)
प्रा.अमोल पांडूरंग ढोरमारे
( कीटकशास्त्रज्ञ द अग्रि कोड कृषि प्रतिष्ठान खापर पांगरी बीड)मो. न ९६०४८३३८१५