नेपाळ आणि सिक्कीम मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात पर्यटनाला गेलेली दोन वेगळी कुटुंब मृत्यू पावल्याच्या बातम्या थरकाप उडवणाऱ्या आहेत आपण बातम्या सुट्या सुट्या वाचतो , वर्षभर झालेले असे अपघात डोळ्यासमोर आणा , ठेवा. त्यातून एक पॅटर्न दिसला कि त्याचे गांभीर्य कळेल आणि ….. अरे आपला नंबर देखील कधीही लागू शकतो हा विचार मनात येईल
“ डोन्ट वरी बी हॅपी” सारख्या उथळ , चंगळवादाला म्हणजे मार्केटला सहाय्य्यभुत अशा , ड्रम पिटवून पिटवून , मनात घुसडलेल्या तत्त्वज्ञानाने. सामान्य नागरिकांची सारासार, स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल किमान काही विचार करण्याची आवश्यक ती काळजी घेण्याची जीवशास्त्रीय प्रेरणा देखील बधीर करून टाकली आहे
निम्न मध्यमवर्गीयांमध्ये पर्यटनाची आवड रुजत आहे हे अनेक अर्थाने स्वागतार्ह आहे , त्या व्यक्तींसाठी आणि मॅक्रो अर्थव्यवस्थेसाठी देखील. पण कोणतेही नियामक मंडळ नसणाऱ्या पर्यटन क्षेत्रात सुरक्षित पायाभूत सुविधा नसलेल्या आपल्या किंवा गरीब देशात ,
जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात विविध सेवा देणाऱ्या लोकल स्थानिक पर्यटन कंपन्या व्यक्ती सर्वत्र तयार झाल्या आहेत. त्यातून सतत काहींना काही अपघात घडत असतात. त्यामुळे पर्यटन स्थळावर स्वस्त आहेत म्हणून वाट्टेल त्या व्यक्ती कंपनीकडून सेवा घेता कामा नयेत. चारच्या ऐवजी दोनच ठिकाणांना भेटी द्या पण जीवाला कोणताही धोका घेऊ नका
अपघात , त्यातील मृत्यू शोकांतिका आहेच , पण आजच्या न्यूक्लियर कुटुंबाच्या युगात अख्खे कुटुंब एकाचवेळी मृत्यू पावणे थरकाप उडवणे आहे. यात श्रीमंत कॉर्पोरेट कुटुंबापासून कंपन्यांपासून शिकण्यासारखे आहे
ज्या कटुंबांचे जिवंत राहण्यात लाखो कोट्यवधी डॉलर्सचे स्टेक असतात ते कुटुंबांचे सभासद कधीच एकाच वाहनातून विमानातून प्रवास करत नाहीत , कारण सारे कुटुंबीय एकाचवेळी मृत्यू पावले तर पूर्ण उद्योग उध्वस्त होऊ शकतो. कॉर्पोरेट मध्ये लिखित अलिखित नियम आहेत कि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स चे सर्व सभासद मिटिंगसाठी एकाच विमानातून नेण्यात येणार नाहीत. हा अभावनिक प्रोफेशनल ऍप्रोच न्यूक्लियर कुटुंबांनी घेतला पाहिजे
लेखन : संजीव चांदोरकर

