बारामती : पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही सोमवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. बारामतीतही जोरदार पाऊस झाला असून शहरातील कऱ्हा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पंचशील नगर भागातील २५ घरांमध्ये पाणी शिरले. या घरांमधील नागरिकांना समाजमंदिरात हलवण्याचं काम सध्या सुरू आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना आणि जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे.
बारामती तालुक्यातील अंजनगाव, करावागज रस्त्यावर पाणी येत आहे. त्यामुळे चव्हाण वस्तीवरील ती कुटुंबे स्थलांतरित केली आहे. मोरगाव, तरडोली, आंबी बुद्रुक, जळगाव सुपे, जळगाव क प , करावागज, सोनगाव, डोरलेवाडी या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाच्या पट्ट्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नाझरे जलाशयात पाणी पातळी वाढली आहे. नाझरे धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून प्रशासनाने विसर्ग सुरू केला आहे.