दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यात सध्या ऊसतोडणी कामाला सुरुवात झाली आहे. परिसरात कुठेना कुठे ऊसतोडणीची कामे सुरू आहेत. बिबट्यांचा अधिवास असलेले मुख्य ठिकाण म्हणजे ऊसशेती. याच उसाची तोडणी सुरू झाली असून, सध्या बिबटे इतरत्र भटकंती करताना दिसत असून, दररोज नागरिकांना बिबट्यांचे दर्शन होत आहे.
दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठच्या नानगाव, हातवळण, कानगाव, गार, पारगाव तसेच शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस, नागरगाव, वडगाव रासाई, सादलगाव, मांडवगण फराटा या भागात सध्या ऊसतोडणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या भागात पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा अधिवास आहे. त्यामुळे या भागात सतत बिबट्यांचे जनावरांवरील हल्ले व नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असते.
सध्या ऊसतोडणीची कामे सुरू असल्याने मोठे उसाचे फड हळूहळू कमी होतील, त्यामुळे मोठ्या उसाच्या फडामध्ये अधिवासासाठी असलेले बिबटे आता छोट्या उसाच्या फडात आपला मुक्काम हलविताना दिसून येत आहेत. या उसाच्या शेतातून दुसरीकडे जाण्यासाठी बिबट्याला आपला मुक्काम हलवावा लागत आहे. एका जागेवरून दुसरीकडे जाताना नागरिकांना आता पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणावर दर्शन होत असल्याचे शेतकरी व नागरिक बोलून दाखवीत आहेत.