देशात सध्या उडदाचे दर चांगले आहेत. उडदाला सध्या सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. यंदा खरिपातील उडीद उत्पादन कमी राहीले. तसंच भारताचा मुख्य उडीद पुरवठादार असलेल्या म्यानमारमध्ये सध्या उडदाची उपलब्धता कमीच आहे.
म्यानमारमध्ये उडदाची आवक जानेवारीत सुरु होते. मात्र आवकेचा मुख्य हंगाम फेब्रुवारीत असतो. त्यामुळं दोन महिने तरी म्यानमारमधून आयात कमी होईल. त्यामुळं देशातील उडीद बाजाराची मदार आता तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील पिकावर आहे. या राज्यांतील उडीद लवकर बाजारात येईल. मात्र सध्या देशात उडदाचा पुरवठा कमी असल्याने दर तेजीत आहेत. यंदा सरकारने उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्याचे दर त्यापेक्षा जास्त आहेत. देशातील बाजारात सध्या सरासरी ५०० टन उडदाची आवक होत आहे. ही आवक मागीलवर्षी याच काळातील आवकेच्या तुलनेत जळपास ८० टक्क्यांनी कमी आहे. त्यातच सध्या देशात गुणवत्तापूर्ण उडदाची उपलब्धता कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. उठाव चांगला मिळतोय. त्यामुळं यंदा उडादाचे दर टिकून राहतील. यंदा उडदाला सरासरी ७ हजार ते ७ हजार २०० रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला..

