अहमदनगर जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील २३९ गावात १ हजार १७४ जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. यातील ५३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे वाढते प्रमाण आहे.
लम्पी बाधित जनावरांची पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेऊन काळजी घ्यावी. तसंच पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरणाची मोहीम सुरु केल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.
पावसाळा सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात १५ जूननंतर लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यातील २३९ गावात लम्पीचा प्रादुर्भाव असून सर्वाधिक रुग्णसंख्या शेवगाव २७९, राहुरी २६९, कोपरगाव १८३, पाथर्डीत १३४ आहे.
कोल्हापुरातही वाढता प्रादुर्भाव
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, गारगोटी, भुदरगड आणि कागल तालुक्यात लम्पीने हाहाकार माजवला आहे. मागच्या सहा महिन्यांत भुदरगड तालुक्यातील ३५० जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील लम्पीचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने पशुपालक चिंतेत पडले आहेत. लम्पीच्या आजारामुळे शेतकऱ्यांच्या देखत जनावरांचा मृत्यू होऊ लागला आहे. यामुळे पशुपालक मोठा आर्थिक फटका बसत आहे.