सध्या राज्यात परतीचा पाऊस सर्वत्र धुमाकूळ माजवत आहे. परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीसाठी आलेली पिके संकटात सापडली आहेत. हार्वेस्टिंग झाल्यानंतर देखील शेतमालाला मोठा फटका बसत आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी सोयाबीनच्या गंज्या वावरातूनच वाहून गेल्या. सोयाबीन प्रमाणेच काढण्यासाठी आलेल्या मका पिकाला देखील याचा फटका बसत आहे.
एवढेच नाही तर आत्ताच लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला ही याचा फटका आहे. तसेच काढण्यासाठी आलेल्या कापूस पिकाला देखील परतीच्या पावसामुळे मोठा फटका बसत असून कापूस पिकाचा दर्जा आणि उत्पादन परतीच्या पावसामुळे कमी होणार असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
एकंदरीत काय तर परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान अजूनही राज्यात परतीचा पाऊस चांगलाच बरसत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी पावसाची हजेरी राहिली. काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. दरम्यान आज देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने (imd) नमूद केले आहे.
आज कोकणातील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. यामुळे निश्चितच अजून तरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मित्रांनो सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांच्या (farmer) डोळ्यासमोर त्यांच्या पिकांची राखरांगोळी होत आहे.
आधीच खरीप हंगामातील सुरुवातीला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. आता अतिवृष्टी पासून बचावलेली पिके परतीच्या पावसाच्या भक्षस्थानी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना निश्चीतच हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.