गेल्या वर्षी साखर उत्पादनात आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने यंदा सर्वात अगोदर आपला गाळप हंगाम संपवला आहे. यंदाच्या हंगामात राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादन करत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे.
तर साखर उत्पादनामध्ये राज्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेश १०२ लाख टन उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यातील ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेखर गायकवाड यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळ ते बोलत होते. यावेळी गायकवाड म्हणाले की, यंदाचा गाळप हंगाम संपला असून राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये १०२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
इथेनॉल उत्पादनातही वाढ
राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. तसेच पुढील वर्षाच्या अखेरीस ती ३०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. राज्यातील पाच कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन सुरू केले असून या कारखान्यांनी साखरेचे उत्पादन बंद केले आहे.
निर्यातीवरील बंधनांमुळे पुढील काळामध्ये आणखी कारखाने पूर्णपणे इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांना साखर कारखान्यांनी इथेनॉल विक्री केल्यानंतर २१ दिवसांमध्ये तेल कंपन्या पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी दिली जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्र देशात पहिला तर जगात तिसरा
गेल्या वर्षी प्रचंड वेगात असणारा महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा लवकर संपला. मागली हंगामाच्या तुलनेत यंदा राज्यात साखर उत्पादनात घट झाली आहे. असे असले तरी यंदाच्या हंगामात महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. तकर जगात तिसऱ्या स्थानी आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.