खरिपात विक्रमी पातळीवर पोहोचणारा मका सध्या मात्र हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात आहे. यंदा रब्बी आणि उन्हाळ हंगामातील मका उत्पादन जास्त आहे. पण दुसरीकडे मक्याला उठाव कमी दिसतो.
तर निर्यातीची गतीही कमी झाली. याचा दबाव दरावर येत आहे. सध्या मक्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. बाजारात मक्याचे भाव १ हजार ७५० ते १ हजार ८५० रुपयांच्या दरम्यान आहेत.
देशात यंदा मका उत्पादनात २२ लाख टनांनी वाढ झाली. यंदा रब्बीतील उत्पादन कमी झाले. पण उन्हाळी मक्याची भर पडली. यामुळे यंदा रब्बी आणि उन्हाळी मिळून १२४ लाख टनांचा पुरवठा झाला. मागील हंगामात रब्बीतील उत्पादन १०१ लाख टन होते. यंदा खरिपातील मक्याला निर्यातीसाठी चांगली मागणी होती.
त्यातच तेलबिया पेंडेचे भावही अधिक होते. यामुळे मक्याला देशांतर्गत उठाव चांगला होता. परिणामी, खरिपातील मक्याने काही बाजारांत विक्रमी ३ हजारांचाही टप्पा गाठला.
आंतरराष्ट्रीय बाजारात रशिया आणि युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या टंचाईमुळे भारतीय मक्याला मागणी होती. पण या दोन्ही देशांमधील माल काही प्रमाणात बाजारात आला. यामुळे दरात नरमाई आली. त्यातच इतर काही देशांमध्येही नवे पीक आले.
एप्रिल आणि मे महिन्यांत भारतीय मक्याला पाकिस्तानच्या स्वस्त मक्याची स्पर्धा होती. पाकिस्तानचा मका स्वस्त होता, यामुळे भारतीय मक्याला कमी उठाव मिळाला. पण पाकिस्तानचे पीक कमी असते. यामुळे जास्त काळ ही स्थिती चालली नाही, असे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले.
जगात मका उत्पादनात अमेरिका आघाडीवर आहे. त्यानंतर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. चालू हंगामात जागतिक मका उत्पादनात घट झाली होती. अमेरिकेतील उत्पादनात घट जास्त होती
सोबतच अर्जेंटिना, युरोपियन युनियन, युक्रेन या देशांमध्येही उत्पादन कमी झाले होते. यामुळे त्यातच रशिया आणि युक्रेनमधून होणारा पुरवठा कमी होता. यामुळे दरवाढीला आधार मिळाला. पण आता नव्या हंगामात अमेरिका, चीन आणि ब्राझील या महत्त्वाच्या तिन्ही देशांमध्ये नवे पीक चांगले येण्याचा अंदाज आहे. याचा बाजारावर दबाव दिसतो.
वायदे ५.८४ डॉलरवर बंद
सध्या अमेरिकेत मका पिकाची स्थिती चांगली नाही. पण अमेरिकेच्या कृषी विभागाने उत्पादनात घट होईल, असे म्हटलेले नाही. अमेरिकेतील काही भागांमध्ये पाऊस नाही. यामुळे पीक संकटात आहे. याचा परिणाम म्हणून अमेरिकेतील बाजारात मक्याचे भाव वाढले. पण ही वाढ शुक्रवारी (ता. २४) कमी झाली.
मागील एक महिन्यात ‘सीबॉट’वर मक्याचे वायदे जवळपास ७ टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारी दुपारी मक्याचे वायदे मागील तीन महिन्यांतील उच्चांकी ६.७३ डॉलर प्रतिबुशेल्सवर पोहोचले होते. पण शेवटच्या सत्रात वायद्यांमध्ये सहा टक्क्यांची घट झाली आणि वायदे ५.८४ डॉलरवर बंद झाले. बाजारात पुढील काळातही चढ-उतार दिसू शकतात, असे जाणकारांनी सांगितले.
दरात मोठ्या तेजीची शक्यता कमी
देशातील बाजारात सध्या रब्बी आणि उन्हाळी मका येत आहे. देशातील बाजारात मक्याचे भाव सध्या दबावातच दिसत आहेत. जास्त ओलावा असलेल्या मक्याचे भाव देशातील काही बाजारांमध्ये अगदी १३०० पासून सुरू होत आहेत. सध्या देशांतर्गत बाजार आणि निर्यातीसाठी मक्याला कमी उठाव आहे. त्यामुळे तूर्तास तरी मक्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता दिसत नाही, असे अभ्यासकांनी सांगितले.
पाऊसमान आणि लागवडीकडे लक्ष
यंदा ‘एल निनो’ची स्थिती आहे. त्यामुळे पाऊसमान अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच खरिपातील लागवडीही काहीशा उशिराने होत आहेत. त्यामुळे खरिपातील पाऊसमान आणि मका लागवड याकडे बाजाराचे लक्ष असेल. अमेरिकेतील मका पिकाची स्थिती कशी राहते यावरूनही बाजाराची दिशा ठरेल, असे अभ्यासकांनी सांगितले.