पुण्यातील देहूमध्ये आजपासून मांस, मासे यासारख्या मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.नव्याने स्थापन झालेल्या देहू नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. फेब्रुवारीमध्ये सर्वपक्षीयांनी एकमताने मंजूर केलेल्या या ठरावाची आजपासून अंमलबजावणी होत आहे.
देहूतील मांस व मासे विक्रेत्यांना ३१ मार्चची मुदत देण्यात आली होती. आता या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
तीर्थक्षेत्र देहू हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी व योगभूमी असल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनार्थ देहूत येत असतात. ही संतभूमी असल्याने श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहूकर यांच्या मागणी अन्वये ग्रामपंचायत काळातही ग्रामसभेत ठराव घेऊन बंदी करण्यात आली होती मात्र पुन्हा हळूहळू मांस, मटन, मासेविक्रीचा व्यवसाय सुरू झाला. तो दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला आहे.
त्यानुसार एक एप्रिलपासून परिसरात मांसविक्री करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. जर परिसरामध्ये कोणी लपून मांस विक्री करताना आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. परिसरामध्ये तशी दवंडी देण्यात आली आहे.