भारतातून कांदा निर्यात वाढली आहे, पण तरीही कांद्याचे दर पडले आहेत. निर्यातीची मागणी आणि देशातील स्थानिक गरज पूर्ण करण्यासाठी जेवढा कांदा आवश्यक आहे, त्यापेक्षा जास्त पुरवठा सध्या होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर दबावात आहेत.
ब्लुमबर्ग वृत्तसंस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यात आठ देशांतील कांदा टंचाईचा वेध घेतला आहे. त्यानुसार तुर्कस्तान, उझबेकिस्तान, युक्रेन, फिलिपाईन्स, तजाकिस्तान, पाकिस्तान, मोरोक्को, बेलारूस या देशांमध्ये शंभर ते आठशे टक्क्यापर्यंत कांद्याचे भाव वाढले आहेत.
तुर्कस्तान व पाकिस्तान हे कांदा निर्यातीत भारताचे स्पर्धक असतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये तुर्कस्तानने कांदा निर्यातबंदी केली.
तर पाकिस्तानात महापूरामुळे तेथील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या दोन देशांकडून स्पर्धा कमी झाल्याने आखाती देशांमध्ये भारताकडून निर्यात वाढली.
एप्रिल ते डिसेंबर २०२२ कालावधीत भारताची एकूण कांदा निर्यात वाढली. आखाती व आग्नेय आशियायी देशांतील मार्केट भारताने परत मिळवले.
चलनविषयक समस्या असतानाही श्रीलंका आणि बांगलादेशातील कांदा निर्यातीत सातत्य दिसले, असे शेतीमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण म्हणाले.
देशातील परकीय चलनाचा साठा घटत असताना भारतीय कांदा उत्पादकांनी त्यात एप्रिल ते डिसेंबर कालावधीत ३९४ मिलियन डॉलर्सची भर घातली आहे.
तसेच जगात कांदा टंचाई असताना देशातील ग्राहकांना वाजवी किंमतीमध्ये कांदा उपलब्ध करून दिला.
त्यामुळे देशाला भविष्यात कांदा उत्पादनात सातत्य राखायचे असेल तर शेतकऱ्यांना थेट अर्थसाहाय्य करावे, असे चव्हाण यांनी सांगितले.