गतवर्षी एप्रिलमध्ये सोळा तारखेला उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू झाली. यंदा एक महिना उलटून गेल्यानंतरही खरेदी सुरू झालेली नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची लवकरच खरेदी सुरु केली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी लासलगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत भेटीप्रसंगी सांगितले. यंदा तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे यंदा उदिष्ट असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली.
यावर्षी लाल कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत टिकवण क्षमता कमी असलेल्या लालकांद्याची नाफेड मार्फत प्रथमच खरेदी करण्यात आली आहे. आता उन्हाळ कांदा सुरु झाला असून नाफेडमार्फत उन्हाळ कांदा खरेदीसाठी तयारी पूर्ण झाली आहे.
लवकरच खरेदी सुरु होणार आहे, यामुळे बाजार समिती स्पर्धा निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी मदत होईल. नाफेडची ओळख ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाली आहे. चाळीस हजार मेट्रिक टनापर्यंत उन्हाळ कांद्याची खरेदी केली जात होती, गेल्या वर्षी अडीच लाख मेट्रिक टन खरेदी झाली होती.यंदा तीन लाख मेट्रिक टन खरेदी केली जाणार आहे. नाफेडबरोबर नाफेडच्या सब एजन्सी शेतकरी प्रोड्यूसर कंपनीही बाजार समितीतून कांद्याची खरेदी करतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असेही मंत्री डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
त्या खरेदीची रक्कम लवकरच
दोन महिन्यापूर्वी नाफेडमार्फत लाल कांद्याची खरेदी करण्यात आली होती, पण अद्यापही लाल कांद्याचे पैसे अदा करण्यात आलेले नाहीत, पण कागदपत्रांची संबंधित नाफेडच्या सब एजन्सीकडून पूर्तता झाल्यानंतर लवकरच पैसे अदा केले जातील असा विश्वास माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला.
बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप ,सचिव नरेंद्र वाढवणे ,सह सचिव प्रकाश कुमावत ,कांदा निर्यातदार व्यापारी मनोज जैन,शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील ,माजी प स सदस्य संजय शेवाळे यांच्यासह आदी उपस्थित होतो.
सोर्स :सकाळ