संत्रा व सोयाबीन उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी मोर्शी (जि.अमरावती) येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी सडलेली संत्र फेकून सरकारचा निषेध केला. परतीच्या अतिपावसाने संत्र्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सरकारकडून अजून नुकसान भरपाई मिळेलेली नाही, संत्र्याला भाव नाही, त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडण्यासाठी या ‘आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अतिपावसाने नुकसान झालेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000/- लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, पिकविम्याची रक्कम तात्काळ मिळावी, संत्रा उत्त्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने विमाहप्ता कमी करून संत्रा उत्त्पादक शेतकऱ्याना दिलासा द्यावा.
संत्रा प्रक्रिया केंद्र उभारावे, संत्रा साठवणूक करण्याकरिता शितगृहे (कोल्ड स्टोरेज) उभारावे, वरुड-मोर्शी तालुका ड्रायझोन मुक्त करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.
या मोर्चाचे आयोजन ‘स्वाभिमानी’चे अमरावती जिल्ह्याचे नेते अमित अढाऊ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.