देशात यंदा मिरची उत्पादन घटले. गेल्यावर्षीप्रमाणं यंदाही तेलंगणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मिरची पिकावर तुडतुड्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. उत्पादकता जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी घटल्याचे शेतकरी सांगत आहेत.
दुसरीकडे मिरचीला मागणी आहे. त्यामुळं सध्या मिरचीचे दर तेजीत आहेत. यंदा उत्पादन कमी असल्यानं बाजारातील आवक वाढल्यानंतरही दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करत आहेत.
देशात मिरची उत्पादनात तेलंगणा आघाडीवर आहे. महाराष्ट्रातही नंदूरबारसह काही जिल्ह्यांमध्ये मिरची उत्पादन होते. मिरची पिकावर यंदाही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवला. त्यामुळं यंदाही उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शेतकऱ्यांना एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. पण यंदा उत्पादन १० ते १२ क्विंटलपर्यंतच स्थिरावल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच अनेक भागातील शेतकऱ्यांनी ८० टक्क्यांपर्यंत माल विकला आहे.
देशात गेल्या हंगामातही मिरची उत्पादन घटले होते. त्यामुळं सध्या गोदामांमध्ये शिल्लक साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. शिल्लक मिरचीचा स्टाॅक यंदा ९० टक्क्यांपर्यंत कमी आहे. यंदाही उत्पादन घटलं. त्यामुळं सध्या मिरचीचे दर तेजीत आहेत.
शेतकऱ्यांनाही यंदा चांगला दर मिळत आहे. पण उत्पादन घटल्यानं घटल्यानं शेतकऱ्यांना फार नफा होताना दिसत नाही.
मिरचीला सध्या चीन आणि बांगलादेशमधून मागणी आहे. सध्या नव्या मालाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे अनेक वाणांचे दर तेजीत आहेत. त्यामुळे अनेक आयातदार नवा माल बाजारात येण्याची वाट पाहत आहेत.