तांदळाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात तांदळाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे.दक्षिण भारतात उत्पादन कमी झाल्याने मध्य भारतातील तांदळाची मागणी वाढलेली आहे. परिणामी, दर वाढू लागले आहेत. येत्या आठवड्यात पुन्हा तांदळाचे भाव वधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
निर्यात हेच बाजारात तांदळाचे भाव वाढण्याचे कारण आहे. पण यासोबत आणखी काही घटकही कारणीभूत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यापाऱ्यांकडे तांदळाचा साठा नाही. यासोबतच हवामानानेही धान उत्पादकांना साथ दिली नाही. पीक शेतात असताना अचानक वातावरण उष्ण झाले.
तसेच वेळेवर पाऊस झाला नाही. भात पीक तयार होत असतानाच पाऊस झाला. त्यामुळे उत्पन्नात सुमारे पाच टक्के घट झाली. सर्वसाधारण ग्राहकांकडूनही नवीन तांदळाची वार्षिक खरेदी केली जात आहे.
त्यामुळे मागणी अधिक आणि आवक कमी झाल्याने भावात सतत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात ४३ रुपये किलो असलेला तांदूळ आता ४८ रुपये, तर ४८ रुपये प्रति किलो असलेला तांदूळ ५३ रुपयांवर पोहोचला आहे.
भात पेरणीचे क्षेत्र घटले
भात पेरणीचे क्षेत्र ५.५१ टक्क्यांनी घटून ४०१.५६ लाख हेक्टरवर आले होते. पीक वर्ष २०२२-२३ (जुलै-जून)च्या खरीप हंगामात ते ४२५ लाख हेक्टर होते. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या भाताच्या पेरणीखालील क्षेत्रावर नजर टाकली, तर झारखंडमध्ये ९.३२ लाख हेक्टर, मध्य प्रदेश ६.३२ लाख हेक्टर, पश्चिम बंगाल ३.६५५ लाख हेक्टर, उत्तर प्रदेश २.३२ लाख हेक्टर आहे.
बिहारमध्ये १.९७ लाख हेक्टरची तूट होती. याशिवाय आसाम, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, मेघालय, ओडिशा, नागालँड, पंजाब, गोवा, मिझोराम, सिक्कीम आणि केरळमध्येही भाताखालील क्षेत्र घटले आहे.
तांदळासोबतच गव्हाचे नवीन पीक येण्यासाठी अद्याप तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात केल्याने त्याचा साठा कमी झालेला आहे. परिणामी, देशांतर्गत गव्हाची मागणी वाढल्याने दरात सतत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात गव्हाच्या दरात प्रति किलो दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे.