कोकण परिसरात खरिपाच्या हंगामातील अनेक शेतकऱ्यांचे भाताचे पीक कापणीला आले आहेत. मात्र, पाऊस पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दोन दिवस पुन्हा पाऊस पडल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. पाऊस थांबला नाही, तर हातातोंडाशी आलेला मोत्याचा घास वरुणराजा हिरावून नेतो की काय? ही चिंता बळीराजाला पडली आहे. सध्या वातावरणात उकाडा असून, आकाश ढगाळलेले असल्याने परतीच्या पावसाची अजूनही शक्यता आहे.
यावर्षी पाऊस वेळेवर झाला असल्याने शेतकऱ्यांची खरिपाच्या हंगामातील भात लावणीची कामे वेळेवर झाली. पीकही चांगले आले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक कापणीला आले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी, जोरदार पावसासह विजेच्या कडकडाटामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे.
परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भातपिकाची नासाडी होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. खोपोली-खालापूरमध्ये भातपीक तयार आहे. अनेक ठिकाणी भातकापणीला सुरुवात झाली आहे; मात्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जाणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी भरत असल्याने भातपीक आडवे झाले आहेत. त्याला कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भातकापणीसाठी मजूर व अन्य जुळवाजुळव सुरू असतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात शेतीचे नुकसान होत आहे.