द्राक्ष बागेतल्या फळ छाटणी अवस्थेअगोदर सर्वात महत्वाची अवस्था म्हणजे खरड छाटणी अवस्था कारण जर खरड छाटणी व्यवस्थापन योग्यरित्या झाले तरच फळ छाटणी व्यवस्थापनाला महत्व आहे. द्राक्षातील खरड छाटणीस फळ (गोडीबहर) छाटणीचा पाया म्हणतात. थोडक्यात एप्रिल महिन्यात खरड छाटणी झाल्यानंतर बागेची योग्य ती काळजी घेतली तरच चांगल्या प्रकारे काडयांची निर्मीती होते व काडी फळधारणा युक्त असेल तरच फळछाटणी महत्वाची यात खरड छाटणीनंतर फुटून आलेल्या नविन फुटीतील योग्य ती फुट राखणे, अतिरिक्त फुटींची विरळणी करणे, दोन (फांद्या) काड्यामधील योग्य अंतर राखणे, वेळेवर सबकेन करणे, सबकेनच्या पुढील शेंडा योग्य वेळी मारणे, काडीवरिल पानांची संख्या नियोजन करणे, अन्नद्रव्यांचा व्यवस्थीत पुरवठा करणे, वेलीस रोग व किड यापासून नियंत्रणात ठेवणे, काडी पक्वता निर्मीती योग्य नियोजन करणे यासारख्या अनेक महत्वाच्या घटनांचा समावेश होतो आणि यानंतर काडी चांगली परिपक्व होत जाते.
काड्याची परिपक्वता होण्यासाठी खरड छाटणीपासून साधारणतः १४० ते १५० दिवसांचा कालावधी लागतो. खरड छाटणीनंतर बागेत सुप्त घड निर्मितीसाठी व त्यांच्या विकासासाठी आवश्यक असे पोषक वातावरण निर्माण होणे गरजेचे असते. त्यात खरड छाटणीनंतर सर्वात महत्त्वाचे सुप्त घड निर्मिती व पोषण ह्या संदर्भात अनेक समज गैरसमज आहेत व त्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल होते व सुप्त घड निर्मितीच्या काळात त्यांच्या हातून कळत नकळत काही चुकीची कामे होतात त्यामुळे सुप्त घड निर्मिती कामात अनेक अडचणी येतात व परिणामी फळ छाटणीमध्ये त्याचा उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडून पडते. तरी सुप्त घड निर्मिती व सुप्त घड पोषण ह्या कामात मदत होईल असे महत्त्वाचे काही घटक आहेत जे कि प्रत्येक द्राक्षबागायतदार बंधुंनी काटेकोर पणे पाळली तर नक्कीच सुप्त घड निर्मिती व सुप्त घड पोषण ह्या कामात खूप मदत होईल. अशा महत्त्वाच्या घटकांचे विवरण खालील प्रमाणे आहेत.
खरड छाटणी व्यवस्थापन :-
खरड छाटणीनंतरचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, संजीवकांचा योग्य वापर, काडी व्यवस्थापन आणि पानांचे (कॅनोपी) व्यवस्थापन या महत्वाच्या घटकांचा समावेश होतो.
खरड छाटणी पुर्व व्यवस्थापन:-
एप्रिल छाटणी (खरड) आगोदरच्या ऊपाय योजनामध्ये द्राक्ष बागेचे बोध फोड़ने आवश्यक आहे. जमीन भुसभुशीत होते. जमीनीत हवा खेळती राहते. जुन्या मूळया तुटल्यानंतर नविन मूळीस चालना मिळते, नविन मूळ्यांची वाढ चांगली होते. ज्या ठिकाणी पाणी क्षार युक्त आहे त्या जमिनीत क्लोराईडचे प्रमाण वाढलेले असते. अश्या जमीनी पांढऱ्या होतात जमिनीवरती पातळ पांढरा थर तयार होतो. जमिनीवरती मिठ फुटल्यासारखे दिसते. दरवर्षी बोध फोडल्यामूळे जमीनीतील क्षारांचे प्रमाण कमी होते. जमिनीतील किडींची अंडी असतात. उदा. मिलीबग, खोडकिड, इतर कीटक व त्यांची अंडी बोधामध्ये जमीनीत आसतात. बोध फोडल्यामुळे जमीतीतुन बाहेर येतात व खरड छाटणी वेळी तापमान 35 ते 40अंश सेल्शिअस असते छाटणी केल्यानंतर सूर्यप्रकाश पूर्णपणे जमिनीवर पडतो त्यामुळे किटक व त्यांची अंडी यांचा नाश होतो. त्यामुळे खरड छाटणीला लागणार्या किटकनाशकांच्या खर्चात 20 ते 30% बचत होते व फळ छाटणीच्या देखील किड नियंत्रणासाठी मदत होते. या काळात पांढर्या मुळींच्या उत्तम वाढीसाठी हुमिक असिडचा प्रति एकरी अर्धा ते एक किलो याप्रमाणे वापर करावा. वेलीची झीज भरून निघण्यासाठी वेलीवर चांगल्या दर्जेचा घड तयार होण्याकरता लागणारे अन्नद्रव्य हे वेलीमधून वापरले जाते, त्यामुळे वेल अशक्त झाली असेल म्हणून फळ काढणी ते खरड छाटणी मध्ये कमीत कमी १५ ते २० दिवसाचा कालावधी ठेवावा, त्यामुळे वेलीची झीज भरून निघते, त्या कालावधीत एक ते दोन दिवसाआड पाणी व थोडेसे नत्र सुरु ठेवावे. पहिले पाणी हे भरपूर बेड पूर्ण ओलाचिंब होईल तोपर्यंत द्यावे व त्यासोबत युरिया ५ ते ६ किलो + पोटॅशिअम हुमेंट (हुमिक असिड) २ किलो + विद्राव्य खत १९:१९:१९ – ५ किलो प्रति एकरी द्यावे.
एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन:-
सर्वप्रथम सर्वात महत्वाचे माती व पाणी परीक्षण करून घेणे. कारण आपल्या द्राक्ष बागेत कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत, कोणती अन्नद्रव्य जास्त व कोणती अन्नद्रव्य कमी याचा अचुक अंदाज आपल्याला येईल यामुळेच आपल्याला अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन अचुकरित्या करणे शक्य होईल. त्यामुळे आपल्या कडून होणारे चुकिचे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन आणि त्याचा माती, पाणी त्याचबरोबर वेलींवर होणारा परिणाम आपण टाळू शकतो व आपल्या कडून होणारा अवाजवी/ चुकीचा खर्च टाळता येईल पर्यायाने आपल्या द्राक्ष बाग खरड छाटणीचे नियोजन करत असताना आपल्याला एक उत्तम अन्नद्रव्य व्यवस्थापन साध्य करणे शक्य होईल.
माती परिक्षण करण्याकरिता आपल्या बागेतील ड्रीपरपासून सुमारे दहा ते बारा से.मी पुढे वीस ते पंचवीस सेंमी खोल माती काढावी. अशाप्रकारे आपल्या एका प्लॉटमधून साधारणतः ४ ते ५ ठिकाणची माती काढून सर्व माती एकत्र गोळा करून त्याला व्यवस्थीत मिसळून त्याचे चार भागात विभागणी करून त्यातील दोन भाग कमी करून उरलेल्या दोन भागाचे परत चार भाग पाडावे असे चार पाच वेळा करुन शेवटी ५०० ग्रॅम माती शिल्लक राहिली पाहिजे म्हणजे ही ५०० ग्रॅम माती परिक्षणासाठी लॅबोरेटरीमध्ये पाठवावी.
बऱ्याच द्राक्ष बागेतील जमिंनीची अवस्था आता चांगली नाही राहिली. सेंद्रिय घटकांचा अभाव, पाणी देण्याची चुकीची पद्धत, जमिनीचा वाढलेला सामू, सेंद्रिय कर्बचा अभाव, अशा अनेक गोष्टीमुळे जमिनीतून खतांचा अपटेक कमी होऊन कायम कुठल्याना कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता जाणवत असते म्हणून सर्वप्रथम माती व पाणी परीक्षण करून घेणे गरजेचे आहे. कारण जर आपणास मातीच्या उपलब्ध असलेल्या व उपलब्ध नसलेल्या घटकांविषयी माहिती मिळाल्यास आपण बागेचे योग्य प्रकारे नियोजन करू शकतो. त्यामुळे सुप्त घड निर्मितिच्या काळात आवश्यक अशा अन्नघटकांची फवारणीतून उपलब्धता करत राहिल्यास त्याचे योग्य परिणाम मिळून सुप्त घड निर्मितीमध्ये चांगला फायदा मिळतो. परंतु याचा अर्थ असा नव्हे कि फ़क़्त फवारणीतुंनच अन्नद्रव्ये द्यावी.
दोन्ही ठिकाणाहून आवश्यक अन्नद्रव्ये पुर्तता करावी जमिनीतूनही आणि फवारणीतुंनहि त्यात प्रामुख्याने पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ह्यांची पूर्तता खूप आवश्यक असते. म्हणून ह्या अन्नद्रव्यांची फवारनीतुनही पूर्तता करत राहावी. नत्राचा अति वापर टाळावा अति नत्र वापराचा सुप्त घड निर्मितीवर खूप विपरीत परिणाम होत असतो. अन्नद्रव्ये कमतरता जाणून घेण्यासाठी आपल्या बागेतील वेगवेगळ्या अवस्थेनुसार पान देठ परीक्षण केल्यास अचूक निदान होऊन आपल्याला नेमक्या खतांच्या कमतरता समजून येतात व आवश्यक ती पूर्तता करता येते त्यामुळे खतांवरील अनावश्यक खर्च देखील टळतो. योग्य मात्रेत योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन देखील करता येते.
यात खरड छाटणी मध्ये एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन फायदेशीर ठरेल. शेणखत, सेंद्रिय खत, जिवाणू खत, मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा संतुलित वापर करावा.खरड छाटणीपुर्वी किमान १० ते १५ दिवस अगोदर बेसल डोस द्यावा. यामध्ये एकरी १० टन चांगले कुजलेले शेणखत + सेंद्रिय खत (अखाद्य पेंडी मिक्स) २५० किलो + सल्फर (गंधक) ४० ते ५० किलो + २०० ते २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट + सल्फेट ऑफ पोटॅश २५ ते ३० किलो प्रति एकर द्यावे.
खरड छाटणी केल्यानंतर छाटणी केलेल्या काड्या बोदावरती व्यवस्थीत टाकून घेणे. वरील दिलेल्या खतांचा मात्रामध्ये प्लॉटच्या परिस्थितीनुसार बदल करावा. खते ड्रीपर खाली न टाकता पसरून घालावे व नंतर रोटरच्या साह्याने वरती थोडी माती लावून घ्यावी व नविन बोध तयार करुन घ्यावा. त्यावर पाचटकुट्टी घातल्यास अतिउत्तम पाचटकुट्टीमुळे जमिनीतील ओल टिकून राहते. पाणी कमतरता असलेल्या विभागांमध्ये मल्चिंग फायदेशीर ठरते. कमी पाण्यामध्ये एप्रिल काडी नियोजन होऊ शकते. एप्रिल छाटणी नंतर बागेस 30 दिवस पाणी भरपूर देणे त्यामुळे आपली द्राक्ष बाग एकसारखी फुटण्यास मदत होईल.
खरड छाटणी नंतरचे व्यवस्थापण:-
१) खरड छाटणी वेळी अमोनियम सल्फेट २५ ते ३० किलो + मॅग्नेशियम सल्फेट २५ किलो + झिंक सल्फेट १५ किलो + फ़ेरस सल्फेट २० किलो + बोरॉन १ किलो + मिक्स मायक्रोन्युट्रीएंट्स १० ते १५ किलो प्रति एकर द्यावे.
३) खरड छाटणीनंतर २० ते २५ दिवसांनी डायअमोनियम फॉस्फेट (DAP) ५० किलो + मॅग्नेशियम सल्फेट १५ किलो प्रति एकर द्यावे.
४) खरड छाटणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी सल्फेट ऑफ पोटॅश ३० किलो + मॅग्नेशियम सल्फेट १० किलो प्रति एकर द्यावे.
५) खरड छाटणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी सल्फेट ऑफ पोटॅश ३० ते ३५ किलो प्रति एकर द्यावे.
६) खरड छाटणीनंतर गरजेनुसार विद्राव्य खते 19:19:19, 12:61:00, 00:52:34, 00:00:50 ड्रीपद्वारे द्यावे.
खरड छाटणीनंतर दिलेली खते चांगल्या प्रकारे उपलब्ध होण्यासाठी जिवाणू खतांचा वापर अवश्य करावा. त्यात ऍझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी किंवा लिक्विड बायो एनपीके याचा वापर फायदेशीर राहील.
अ) खरड छाटणीनंतर पहिले ४० दिवस फुटींच्या व पानांच्या वाढीसाठी नत्र या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या अवस्थेत नत्र या अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.
ब) खरड छाटणीनंतर ४० ते ६० दिवस या दिवसांत काड्यांच्या विकासासाठी व सुप्त सूक्ष्म घड निर्मितीसाठी स्फुरद या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या अवस्थेत स्फुरद या अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.
क) खरड छाटणीनंतर ६० दिवसांनंतर काड्यांच्या पक्वतेसाठी व काडीवरील भरगोस टपोऱ्या फळधारणा युक्त डोळ्यांच्या निर्मितीसाठी पालाश या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या अवस्थेत पालाश या अन्नद्रव्यांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी.
(स्थानिक माती, पाणी, पान व देठ परिक्षण अहवालानुसार वरिल खतांच्या मात्रेत बदल होऊ शकतो.)
खरड छाटणीपुर्वी व नंत्तर रासायनिक खते आणि सेंद्रिय खते, जैविक खते देण्याचे प्रमाण ६०:४० असे असावे. कारण जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे कर्बाचे प्रमाण किमान १ टक्का असावे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीमध्ये हवा खेळती राहते व वनस्पतींना अन्नद्रव्यांची उपलब्धता चांगल्या प्रकारे होते त्यामुळे वनस्पतींची वाढ व विकास योग्य पद्धतीने होते याचाच परिणाम उत्पादनात भरगोस वाढ मिळते.
पाणी व्यवस्थापन :-
मित्रांनो, द्राक्ष बागेतील पाणी व्यवस्थापन हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे तसेच किचकट व गुंतागुंतीचा देखील आहे कारण प्रत्येक ठिकाणची पाणी देण्याची पद्धत हि तेथील हवामान, वातावरण, हवेचा वेग, तापमान, जमिनीचा प्रकार, जमीनीची खोली ह्यानुसार बदलत असते. त्यामुळे द्राक्ष बागेत वाढीच्या प्रत्येक अवस्थेत पाणी महत्वाचा घटक असुन द्राक्ष बागेत वेलिच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची मात्रा द्यावी. द्राक्षे बागेतल्या खरड छाटणी ते फळ छाटणी या कालावधीत एकुण महत्वाच्या तीन अवस्था आहेत.
1) द्राक्ष वेलीची शाखीय वाढ अवस्था (1 ते 30 दिवस) :- या अवस्थेत द्राक्ष वेलीला पाणी जास्त प्रमाणात लागते.
2) द्राक्ष घडनिर्मिती अवस्था (31 ते 60 दिवस) :- या अवस्थेत शाखीय वाढीच्या अवस्थेपेक्षा कमी प्रमाणात पाणी लागते.
3) काडी पक्वतेची अवस्था (61 ते 90 दिवस) :- वरिल दोन्ही अवस्थेपेक्षा या अवस्थेत फारच कमी प्रमाणात पाण्याची गरज असते.
याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे द्राक्षाच्या बागेला जमिनीचा प्रकार पाहून पाणी कमी जास्त प्रमाणात द्यावे लागते. जमिनीत पाणी किती असावे, महत्वाचे म्हणजे मुळांची वाढ होण्यासाठी जमिनीत काही प्रमाणात पाणी असणे गरजेचे आहे, या परिस्थीतीस वाफसा परिस्थीती असे म्हणतात. सर्वात महत्वाचे मुळी, पाणी आणि पाने यांचा एकमेकांशी असलेला संबंध लक्षात घेणे गरजेचे आहे.
1) खरड छाटणीपुर्व पाणी व्यवस्थापन (विश्रांतीचा कालावधी):-
द्राक्ष फळ काढणीनंतर द्राक्ष बागेत शक्यतो पाण्याचा ताण दिला जातो. काही गैरसमज असल्यामुळे पाणी व्यवस्थापनाची विशेष काळजी घेतली जात नाही. द्राक्ष बागेमध्ये गेल्या हंगामात वेलिची झिज झाल्यामुळे खरड छाटणी पुर्वी ती झिज भरुन काढणे गरजेचे असते. तेव्हा विश्रांतीच्या कालावधी मध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापनाची ऊपाययोजना करणे गरजेचे आहे. जर वरिल ऊपाय योजना वेळेवर केली नाही तर त्यामध्ये प्रामुख्याने द्राक्षवेलीची पाने पिवळी पडून गळून पडतात. पाणी न दिल्याने पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबते. त्याचा परिणाम म्हणून कार्बोहायड्रेटच्या रूपातील मुळातील व खोडांतील राखीव अन्नसाठा कमी होतो. विश्रांती काळात मुळांची वाढ व विकास होत असतो. परंतु द्राक्षवेलींना जर आपण पाणी दिले नाही तर मुळांची वाढ व विकास होत नाही. त्यामुळे पाहिजे त्या पोषणद्रव्यांचे शोषण पाहिजे तसे होत नाही. परिणाम म्हणून खरड छाटणीनंतर फुटींना निरोगी वाढीसाठी राखीव अन्नसाठा उपलब्ध न झाल्याने त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन काडीच्या डोळ्यात तयार होणार्या घडाच्या आकारावर विपरित परिणाम होतो. विश्रांतीच्या कालावधीमध्ये वेलीस थोड्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करावा त्यामध्ये पाच ते सहा हजार लिटर पाणी प्रति एकर प्रतिदिनी याप्रमाणे किमान 3 ते 4 वेळा दिल्यास वेलिची झिज भरुन निघणे सोपे होईल.
2) खरड छाटणीनंतर शाखीय वाढ अवस्था काळातील पाणी व्यवस्थापन :-
ह्या अवस्थेत पाण्याची गरज भरपूर असते. खरड छाटणी नंतर आपल्या द्राक्ष बागेत फुटी निघाल्यानंतर फुटींची वाढ जोरदार होत असते त्यामुळे बागेत पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सुरवातीचा शाखीय वाढीचा कालावधी खुप महत्वाचा असतो कारण यावेळी ज्या निरोगी फुटी निघतात त्या निरोगी फुटीच्या वाढीवर घड निर्मीती व काडीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा, साठा गोळा होणे या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून यावेळी तापमान व बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेऊन वेलीस पाणी द्यावे. या अवस्थेत साधारणतः पंधरा ते वीस हजार लिटर पाणी प्रति एकर प्रतिदिनी याप्रमाणे द्यावे. जमिनीचा प्रकार, तापमान व बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेऊन वरिल पाण्याच्या प्रमाणात बदल करू शकता. अशा प्रकारे पाण्याचे व्यवस्थापन केल्यास नविन निघणार्या फुटींची अपेक्षित वाढ होते. वेलीस दिल्या गेलेल्या पाण्यामुळे मुळांच्या कक्षेतील तापमान कमी होऊन मुळांच्या पेशींची वाढ होण्यासाठी मदत होईल. त्यामूळे बोदामध्ये कार्यक्षम पांढरी मुळी निर्माण होऊन जमिनीत उपलब्ध पाणी ही मुळी वेलीस पुरवठा करेल. त्यामूळे वेलीस शाखीय वाढीच्या अवस्थेत दिलेल्या खतांच्या मात्रांचा ही वर उचलून दिल्यास वेलिची शाखीय वाढ उत्तम होण्यास मदत होईल.
3) घडनिर्मीती अवस्था काळातील पाणी व्यवस्थापन :-
द्राक्ष बागेत घड निर्मीती होण्यासाठी पाणी व्यवस्थापन फारच महत्वाचे आहे. द्राक्ष बागेत वेलिच्या वाढीचा जोम हा घड निर्मीती च्या दृष्टीने हानिकारक ठरतो. द्राक्ष वेलिचा वाढीचा जोम वाढल्यास वेलिमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण जास्त होऊन सायटोकायनीनचे प्रमाण कमी होते. याचा परिणाम म्हणजे द्राक्षाच्या काडीवरिल डोळ्यामध्ये घडाचे रुपांतर बाळीमध्ये होते. ही वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी शाखीय वाढीच्या अवस्थेत ज्या प्रमाणात पाण्याची मात्रा दिली आहे त्याच्या निम्याने पाणी कमी करावे. जमिनीचा प्रकार, तापमान आणि बाष्पीभवनाचा वेग लक्षात घेऊन पाणी कमी जास्त करावे. ह्याच अवस्थेला सुप्त घड निर्मितीचा काळ देखील म्हणतात कारण ह्या काळात सुप्त घड निर्मितीचा वेग वाढतो म्हणून ह्या काळात देखील वापसा राखून योग्य रीतीने आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पाणी नियोजन करणे आवश्यक असते.
4) काडी पक्वता अवस्था काळातील पाणी व्यवस्थापन :-
काडीच्या परिपक्वतेच्या कालावधी मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे वेलिची वाढ नियंत्रणात ठेवणे होय. ह्या अवस्थेला सुप्त घडाचा विकास होण्याचा काळ देखील म्हणतात. सर्वात जास्त नुकसान ह्या काळात बागायतदारांच्या हातून होत असते कारण बहुंतांश शेतकऱ्याचा समज असतो कि ह्या काळात पाण्याची गरज नसते. काडी पक्वतेसाठी कमी पाणी दिल्याने लवकर पक्वता होते असा समज असतो. परंतु खरा घड पोषण होण्याचा हाच काळ असतो व बागायतदारांच्या चुकीच्या गैरसमजामुळे इथे पाण्याचा ताण पडून जवळजवळ ३०/३५ टक्के नुकसान ह्या स्टेजला होते. म्हणून ह्या काळात दुर्लक्ष न करता वापसा स्थिती बघून आवश्यक तितक्या पाण्याची पूर्तता आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार करत राहावी. शेंडावाढ नियंत्रणात ठेउन काडीची परिपक्वता होण्यासाठी साधारणतः बागेत यावेळी पाणी नियंत्रणात असावे.
5) कमी पाण्याची उपलब्धता असतानाचे पाणी व्यवस्थापन :-
द्राक्ष बागेत खरड छाटणीनंतर सुरवातीच्या शाखीय वाढीच्या अवस्थेत (1 ते 30 दिवस) पाणी जास्त प्रमाणात गरजेचे असते. बागेत जर या कालावधीत पाण्याचे प्रमाण कमी असेल तर खालील गोष्टींची ऊपाय योजना करणे गरजेचे आहे.
द्राक्ष बागेत बोदावर आच्छादनाचा वापर करावा. यात हिरवळीचे खत, शेणखत, काडीकचरा, ऊसाचे पाचट यासारख्या माध्यमांचा वापर करून जमिनितून बाष्पीभवनाद्वारे पाण्याचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. त्याचप्रकारे पाण्याचे व्यवस्थापन करत असताना वेळापत्रक तयार करून पाणी दिल्यास आवश्यकतेपेक्षा जास्त पाण्याचा वापर होणार नाही. कमी पाण्याची उपलब्धता व बागेतील तापमान लक्षात घेऊन एकतर सकाळी किंवा संध्याकाळी पाणी दिल्यास बाष्पीभवन कमी होते. बागेत कॉनॉपी नियंत्रणात ठेवल्यास कमी पाणी उपलब्धता कालावधीत योग्य पाणी व्यवस्थापन करता येईल.
वरील प्रमाणे पाणी व्यवस्थापन केल्यास नक्कीच वेलीला हवे तसे पाणी मिळेल व द्राक्षवेल चांगला अन्नसाठा व फळधारणा निर्माण करण्यात सक्षम ठरेल व याचा परिणाम शेवटी उत्पादनामध्ये वाढ मिळेल.
काडी व्यवस्थापन :-
द्राक्ष बागेतील काडी व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण याच काडी व्यवस्थापनामुळे पुढे हमखास घड निर्मीती साधता येते. बागेत खरड छाटणी नंतर नविन फळधारीत काडी तयार करणे हा महत्वाचा ऊद्देश असतो. त्यानूसार काडी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. द्राक्ष बागेत खरड छाटणी नंतर १० ते १२ दिवसांच्या कालावधी मध्ये डोळे फुटायला सुरवात होते. साधारणतः १२ ते २२ दिवसांपर्यंत फुटी बाहेर निघताना दिसतात. हमखास घड निर्मितीसाठी द्राक्ष बागेत पोषक परिस्थिती व काही महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेणे आवश्यक आहे.
त्यात खरड छाटणीनंतर नविन फुटी निघण्यास चालना देणे, द्राक्ष वेलींची शाखीय वाढ साधणे, नविन फुटींची विरळणी करणे, नविन फुटींच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, योग्यवेळी शेंडा पिंचींग / सबकेन करणे, काडीवरील प्रत्येक डोळ्यांवर पुरेसा सुर्यप्रकाश पडेल याची काळजी घेणे, वेलीस वाढीच्या व अन्नधारणेच्या काळात पुरेशा प्रमाणात स्फुरदची मात्रा द्यावी, द्राक्ष बागेत संजीवकांचा वापर गरजेनुसारच करावा, फुटींना त्यांच्या आकारानुसार तारेवर बांधून घ्यावे, द्राक्ष काडीतील डोळ्यामध्ये ज्या वेळी सूक्ष्म घड निर्मीती होते त्यावेळी विशेष लक्ष देऊन सर्व बाबींच्या पुर्ततेची काळजी घ्यावी. वरिल प्रमाणे सर्व बाबीं काळजीपूर्वक केल्यास नक्कीच द्राक्ष बागेत घड निर्मीती साधता येईल.
अ) वेलीची शाखीय वाढ :-
खरड छाटणी नंतर द्राक्ष बागेत नविन फुटी निघाल्यानंतर फुटींची वाढ जोमात होत असते याकरिता बागेत अन्नद्रव्य व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते. सुरवातीचा शाखीय वाढीचा हा कालावधी खुप महत्वाचा असतो. कारण यावेळी निघालेल्या फुटींच्या वाढीवर घड निर्मीती व काडी मध्ये अन्नसाठा निर्माण होणे अवलंबून असते.
ब) नविन फुटींची विरळणी :-
हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे खरड छाटणीतील सुप्त घड निर्मितीसाठी व सुप्त घड पोषणासाठी खरड छाटणी नंतर ५ ते ६ पान अवस्थेत नविन फुटींची विरळणी करणे आवश्यक असते ह्यातून एकसारख्या आकारची, समान वयाची, समान जाडीची काडी मिळण्यास मदत होते. तसेच दोन काड्यातील अंतर योग्य रीतीने राखल्यास हवा खेळती राहते, फवारणी सर्व भागावर झाल्याने रोग कीड प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळते, सर्व डोळ्यांना सूर्यप्रकाश मिळण्यास देखील मदत होते त्यामुळे फळधारक डोळ्यांची संख्या वाढते. नविन फुटींची विरळणी करताना प्रति १.३३ चौरस फुटास एक काडी असे नियोजन करावे. म्हणजे आपली बाग ९ × ५ अंतराची असेल तर ३०-३५ प्रति झाड काडी संख्या ठेवावी. १० × ६ अंतराची बाग असेल तर ३५-४० प्रति झाड काडीसंख्या ठेवावी.
क) योग्यवेळी शेंडा पिंचींग / सबकेन करणे :-
यावेळी द्राक्ष बागेत नविन फुटींची वाढ जोमात चालू असते परंतू यावेळी ही वाढ नियंत्रणात असणे महत्त्वाचे असते. बागेत या अवस्थेत वाढ जितकी जास्त प्रमाणात असेल तितक्याच प्रमाणांत घड निर्मीती कमी होते. म्हणून ही वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्यवेळी शेंडा पिंचींग / सबकेन करणे गरजेचे असते. या नविन फुटींचा शेंडा खुडल्यांमुळे काडीतील जिबरेलिन्सचे प्रमाण कमी होऊन सायटोकायनीन चे प्रमाण वाढून घड निर्मीती चांगली होते. जास्त जोमात वाढ होत असलेल्या परिस्थितीत फुटीला ९ ते १० पाने येताच द्राक्ष जातीनुसार ५ ते ७ पानांवर शेंडा पिंचिंग किंवा सबकेन करावी. सबकेन केल्यामुळे काडीच्या शेंड्याकडे जाणारा अतिरिक्त जोम किंवा अन्नाचा साठा थांबतो आणि तो जोम किंवा अन्नाचा साठा पोषण फळधारक डोळ्याकडे जाऊन सुप्त घड निर्मितीसाठी आवश्यक मदत होते. तसेच फळ छाटणीमध्ये छाटणीसाठी योग्य अशी खुण मिळते. यानंतर शेंडा खुडलेल्या डोळ्यांच्या खालील डोळे फुटतील यालाच बगल फुटी असे म्हणतात. ही बगल फुटी ह्या पुन्हा ५ ते ७ पाने असताना ३ ते ५ व्या पानांवर खुडून घ्याव्या जास्त वाढू दिल्यास अनावश्यक गर्दी होते व फलधारक डोळ्याना सूर्यप्रकाश भेटत नाही तसेच काडीतील स्टोरेजचा अपव्यय तर होतोच परंतु रोग कीड प्रादुर्भाव देखील वाढून फळ धारक डोळ्यांना इजा पोहचते.
ड) टॉपिंग करणे :-
हे सुद्धा खूप महत्वपूर्ण असे काम आहे. टॉपिंग करण्यास उशीर झाल्यास काडीतील अतिरिक्त अन्नसाठा हा काडीच्या शेंड्याच्या विकासासाठी वापरला जाऊन फळधारक डोळ्यातील सुप्त घड निर्मिती कमकुवत होते अथवा घडाचा विकास मंदावतो व आगामी काळात मोठ्या अडचणीस सामोरे जावे लागते. म्हणून सबकेन नंतर काडीला पुन्हा ७ ते ९ पाने येताच शेंडा खुडून घ्यावा.
ई) वेलींना वळण किंवा आकार देणे :-
मोकळी कनॉपी ही बागेमध्ये द्राक्षवेल सशक्त आणि रोगमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. अशा बागेत फवारणी केल्यास औषधांचा कव्हरेज सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल. मोकळे वातावरण निर्माण झाल्यास काडीची परिपक्वता वेळेवर होईल. ज्या बागेत वेलिची वाढ नियंत्रणात असेल त्या बागेत सायटोकायनिनचे प्रमाण जास्त असते. सायटोकायनिनचे वाढलेले प्रमाण व नियंत्रीत वाढ हे काडीच्या परिपक्वतेची व सशक्ततेची ओळख असते. अशा प्रकारच्या वेली रोग व किड़ींना बळी पडत नाहीत.
इ) पावसाळ्यातील शेंडा खुडणे किंवा टिकली मारणे :-
द्राक्ष बागेत ९० ते १२० दिवसांच्या कालावधी मध्ये काडी पूर्णपणे परिपक्व होण्याच्या मार्गावर असते. परंतु याच काळात पाऊस असतो व त्या काळात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण देखील वाढते. त्यामूळे पावसाळ्यात वारंवार शेंडे फुटत असतात असे शेंडे वारंवार खुडून टाकले पाहिजे कारण असे शेंडे वाढून दिल्यास काडीतील अतिरिक्त अन्नसाठा वाया जातो व सुप्त घड पोषण कमकुवत होऊन पुढे अनेक समस्या निर्माण होतात तसेच उत्पादनात घट होते. अशा परिस्थितीत शेंडा सारखा न खुडता फक्त टिकली मारावी. बागेत नत्राचा वापर पुर्णपणे बंद करून पोटशची फवारणी करावी किंवा जमिनीतून पुर्तता करावी. अश्या कोवळ्या शेंड्यावर पावसाळी वातावरणात करपा व झानथो सारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन मागील पाने अवेळी खराब होण्याचे प्रमाण वाढते.
संजीवकाचां वापर :-
खरड छाटणी नंतर द्राक्ष वेलीला वेगवेगळ्या अवस्थेत वेगवेगळ्या संजीवकांची आवश्यकता असते आपल्या चुकीच्या कामामुळे वनस्पतीतील हार्मोन्सचा इन बॅलन्स होत असतो त्यात चुकीची पाणी देण्याची पद्धत, खतांच्या चुकीच्या मात्रा, खते देण्याची चुकीची पद्धत, वातावरणातील होणारे बदल, अति तापमान, ढगाळ वातावरण, वेळी अवेळी पडणारा पाऊस ह्यामुळे द्राक्ष वेलींतील हार्मोन्सचा इन बॅलन्स होत असतो. तरी त्यासाठी आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या संजीवकांचा वापर जसे सी.सी.सी.(Chlormequat chloride (CCC) (निर्यातक्षम बागेसाठी वापर टाळावा), युरासील, ६ बी.ए, सिपिपियू, तसेच इतर वाढ नियंत्रके ह्यांचा वापर केल्यास हमखास सुप्त घड निर्मिती होण्यास मदत होते.
पांनाची कार्यक्षमता:-
वरील सर्व गोष्टी व्यवस्थित करून शेवट पर्यंत कार्यक्षम व टिकाऊ पाने ज्या शेतकरी बांधवांनी जोपासली तोच शेतकरी सुप्त घड निर्मिती व घड पोषण सांभाळू शकतो. त्यासाठी वेळोवेळी एकात्मिक कीड व रोग नियंत्रण सांभाळणे आवश्यक असते. त्याव्यतिरिक्त सुरुवातीच्या काळात द्राक्ष वेलीला जैविक अजैविक ताणापासून मुक्त ठेवण्यासाठी व वेलीला प्रोटीन व्हिटॅमिनची उपलब्धता होण्यासाठी सिविड एक्सट्रॅक्ट, सिलिकॉन व इतर पोषक घटकांचा फवारणीतून वापर करूनही पांनाची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते आणि पावसाळी वातावरणात भुरी, डावणी, करपा, झान्थोमोनाससारख्या बुरशीजन्य रोगांचे शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे. कारण लवकर पाने खराब झाल्यास फळधारक डोळे अवेळी फुटून खूप नुकसान होते. सर्वात महत्वाचे म्हणजे वेलीला एकात्मिक अन्नद्रव्य, रोग-कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पानांचे रक्षण केल्यास भरघोस अन्नद्रव्यांची निर्मिती शक्य आहे.
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍
-✍ श्री.सतिश भोसले @ 09762064141.