पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे नाव काढताच आज आठवतात ती गोड स्वादाची अंजिरे आणि भल्या मोठ्या आकाराची सीताफळे.आज संपूर्ण पुरंदर तालुक्यात सीताफळ उत्पादकांची संख्या मोठी आहे. दर्जेदार फळांचा गोडवा देशभरातील अनेक राज्यात त्यात गुजरात, गोवा, कर्नाटक या राज्यांपर्यंत पोचला आहे. कोल्हापूर, मुंबई, नाशिकसह विविध शहरांमध्येही सासवडच्या सीताफळांना चांगली मागणी आहे.
अलीकडील वर्षांत रबडी व अन्य प्रक्रिया उद्योगांसाठी सीताफळांचा गर काढण्याचा व्यवसाय वाढला आहे. त्यामुळे तिसऱ्या व चौथ्या दर्जाच्या फळांची त्वरित उचल होणे शक्य झाले आहे.आकर्षक पॅकिंगमध्ये आणि विविध मॉडर्न ट्रेंडला आता हे सिताफळ देशभर विकले जात आहेत.
पुणे जिल्ह्यातील हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश अशी पुरंदर तालुक्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. तालुक्यात पुरंदर किल्ल्याच्या परिसरातील भाग अधिक पावसाचा अर्थातच भाताचा असून उर्वरीत भाग प्राधान्याने पावसावर आधारीत शेतीचा आहे. येथील विहीर बागायतीत किंवा ज्या भागांत संरक्षित पाण्याची थोडीफार सोय आहे अशा पूर्वेकडील पट्ट्यांत सीताफळ, अंजीर आणि पेरू बागा दिसून येतात.
तालुक्यातील आंबोडी, सोनोरी, दिवे, पवारवाडी, झेंडेवाडी, पिंपळे, गुरोळी, सिंगापूर, वाघापूर, राजेवाडी, आंबळे आदी गावांचा समावेश होतो. ही सर्व गावे सीताफळासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
– समीर डोंबे पाटील,
पवित्रक शेतकरी उत्पादक कंपनी.

