नमस्कार शेतकरी बंधुनो, आज या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकातील अतिशय महत्वाचा विषय जो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी बंधूना खूप त्रासदायक ठरत आहे तो म्हणजे गोगलगाय कीड नियंत्रण होय. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक भागातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन पिकावर गोगलगायीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. नुकतेच जमिनीतून वर आलेले सोयाबीन पिक गोगलगाय फस्त करीत आहे. त्यामुळे सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी खूप त्रस्त झाले आहेत, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. त्याचे वेळीच नियंत्रण करून भविष्यातील होणाऱ्या मोठ्या नुकसानाला प्रतिबंध घातला पाहिजे. गोगलगाय नियंत्रण कसे करावे? त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी सविस्तर माहिती आपण सदर लेखात जाणून घेणार आहोत, त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण प्रणालीचा वापर केल्यास उत्तम प्रकारे नियंत्रण मिळवणे शक्य होईल व भविष्यात चांगले उत्पादन मिळवणे शक्य होईल.
गोगलगाय ही बहुभक्षी किड असून ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे पाने खावून अतोनात नुकसान करते. गेल्या ४ ते ५ वर्षा पासून ही किड कोणत्या ना कोणत्या पिकाचे नुकसान करतांना आढळून येत आहे. गोगलगायीचे प्रमुख खाद्य हे सेंद्रीय पदार्थ असतात. असे सेंद्रिय पदार्थ जर गोगलगाईंना मिळाले नाही तर ते कोवळ्या पिकाची पाने कुरतडायला लागतात. त्यामुळे पिकाची वाढ थांबते. त्यामुळे यांचा वेळीच बंदोबस्त करणे खूप गरजेचे असते जेणेकरून भविष्यात होणारे पिकांचे नुकसान टाळता येते. गोगलगाय किडीला पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व कमी तापमान अर्थात ( २० अंश ते ३२ अंश सें . ) पोषक आहे. तरी शेतकरी बंधूंनी वेळीच सतर्क राहून प्रादुर्भाव ग्रस्त भागात या किडीचे नियमित सर्वेक्षण करावे.
गोगलगायींचा परिचय :- गोगलगाय हा मृदुकाय (मॉलस्का) आणि उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायींच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख असेही म्हणतात. मात्र बिना शंखांच्या कवच नसलेल्या गोगलगायी आढळतात. गोगलगायींच्या अंदाजे ३५,००० जाती आहेत. या प्राण्यांमध्ये राहण्याची ठिकाणे आकार, वर्तन, बाह्यरचना आणि अंतर्रचना यांमध्ये विविधता आढळते. श्वसन संस्थेतील प्रकारानुसारदेखील दोन प्रकार आहेत. जमिनीवर राहणाऱ्या गोगलगायी फुफ्फुसाद्वारे, तर गोड्या पाण्यात अथवा समुद्रात राहणाऱ्या गोगलगायी कल्ल्यांद्वारे श्वास घेतात. शंखातली गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेऊ शकते. गोगलगायी उभयलिंगी असतात परंतु स्वफलन होत नसल्याने त्यांना प्रजननासाठी दुसऱ्यांशी गोगलगायींशी संभोग करावा लागतो. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी अंडी घालतात व त्यातून डिंभ अवस्थेतून न जाता प्रौढ प्राणी निर्माण होतात. पाण्यातील गोगलगायी जल-वनस्पती आणि काही वेळा मृत प्राण्यांवर जगतात. शंकूसारख्या दिसणाऱ्या गोगलगायी विषारी असतात.
शंखी ( स्नेल ) तसेच शेंबडी ( स्लग ) गोगलगाय हे प्राणी मालुस्का या वर्गात समाविष्ट कलेले आहेत. शंखीच्या अंगावर टणक कवच असते तर शेंबडीच्या अंगावर कवच नसते, शंखीच्या पाठीवर एक ते दीड इंच लंबगोलाकार कवच असते, बहुतांश शंखी गर्द करड्या फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात. गोगलगाय सरपटत चालते व चालतांना सतत शेंबडासारखा चिकट स्त्राव सोडते, त्यामुळे त्यांना पुढे सरकणे सोपे जाते शेतात हा स्त्राव गाळल्यावर त्या जागेवर पांदुरका चकाकणारा पट्टा दिसतो त्यावरून आपण या किडींचा प्रादुर्भाव झाला आहे हे ओळखू शकतो. रात्रीच्या वेळी गोगलगाय जास्त सक्रीय राहून सोयाबीन पिकाचे नुकसान करते, तर दिवसा ती दगड, पालापाचोळ्याचे खाली किंवा झाडाच्या खोडाभोवतालच्या दाट गवतात, जमिनीला लागून झाडाच्या असलेल्या फांदया खाली इ. ठिकाणी लपून बसते.
गोगलगायींचा जीवनक्रम :- एक मादी सरासरी ८० ते १०० अंडी एकाच वेळी पिकांच्या खोडाशेजारी किंवा मुळांजवळ भुसभुशीत मातीत घालते. ह्या अंड्यांचा रंग पारदर्शक किंवा पांढरा असतो. अशाप्रकारे एक मादी वर्षातून ६ वेळा अंडी देते. सर्वसाधारण १७ दिवसांपर्यंत अंड्यातून पिल्ले बाहेर येतात, त्यांची वाढ पूर्ण होण्यास १० ते १२ महिने कालावधी लागतो.
गोगलगाय एकात्मिक नियंत्रण :-
महाराष्ट्रातील गोगलगायी जून ते सप्टेंबर या काळात अत्यंत सक्रिय असतात व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. हा उपद्रव टाळण्यासाठी एकाच वेळेस सामूहिकरीत्या गोगलगायीचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करून हा उपद्रव पूर्णतः दूर होत नाही.
गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी रासायनिक व जैविक दोन्ही पर्याय आहे.
१ ) शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत व वेळोवेळी शेतात स्वच्छता मोहीम हाती घ्यावी. शेताभोवती सुमारे दोन मीटरच्या पट्ट्यात राख पसरवावी. त्यावर मोरचूद व कळीचा चुना दोनास तीन प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा त्यामुळे गोगलगाय तेथे येत नाही. उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट केल्याने त्या मरतात. कोंबड्या पाळाव्यात त्या गोगलगायी खातात.
२ ) गोगलगायीच्या लपण्याच्या जागा शोधुन त्या स्वच्छ व सपाट कराव्यात. शेतामध्ये ठरावीक अंतरावर उचलता येण्यासारखे गवताचे ढीग ठिकठिकाणी करावेत. त्यांखाली गोगलगायी मोठ्या संख्येने जमतात. लपलेल्या गोगलगायी सकाळी सकाळी गोळा करून त्यांचा नाश करावा.
३ ) प्रादुर्भावग्रस्त शेतात तूषार सिंचना ऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा म्हणजे जमिनीत ओलावा व हवेत आर्द्रता कमी राहील त्यामुळे त्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल .
४ ) गोगलगायीची अंडी मातीमध्ये खोडाशेजारी तसेच गवताच्या ढिगाखाली पुंजक्याने घातलेली असतात, ती शोधून नष्ट करावी. तसेच पिकांच्या मुळाशेजारी मातीमध्ये त्यांनी घातलेली पिवळट पांढऱ्या रंगाची साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत.
५ ) गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी शेतामध्ये ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी गोणपाट किंवा गवताचे ढीग गुळाच्या पाण्याच्या द्रावणात बुडवुन संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी अंथरावीत त्यावर गोगलगायी आकर्षित होईल. गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्या ठिकाणी गोळा झालेल्या गोगलगायी आणि त्यांची अंडी जमा करून नष्ट करावीत असेही आपण गोगलगाय नियंत्रण करू शकतो.
६ ) १५ % मीठाच्या द्रावणामध्ये गोणपाट बुडवून प्रादुर्भावग्रस्त भागामधे १० गोणपाट प्रती एकर याप्रमाणे अंथरावे म्हणजे गोगलगायी दिवसा गोणपाटाखाली लपण्यासाठी जमा होऊन मिठाच्या संपर्कात येवून नष्ट होतील किंवा जमा करून नष्ट कराव्यात.
७) शेतांच्या कडेने राख आणि तंबाखू डस्ट एकत्र मिसळून बॉर्डर लाईन टाकून घ्यावी म्हणजे गोगलगाय आत येणार नाहीत.
८) गोगलगाय रासायनिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी किटकनाशकांचे विषारी आमिष तयार करताना ५० किलो गव्हाचा भुसा अधिक २५ ग्रॅम यिस्ट एकत्र करून गुळाच्या द्रावणात ( २०० ग्रॅम गुळ अधिक १० लिटर पाणी ) १२ ते १५ तास भिजवावे. त्यामध्ये मेटाल्डीहाईड ( २.५ टक्के ) ५० ग्रॅम मिसळावे हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात टाकावे. प्रभावी नियंत्रणासाठी मेटाल्डीहाईड ( २.५ टक्के ) (बाजारात स्नेलकिल नावाने उपलब्ध आहे.) या कीटकनाशकांच्या वड्या तुकडे करून ४ किलो प्रति एकरी वापरावे. वरील प्रमाणे उपाययोजना केल्यास सोयाबीन पिकांतील गोगलगायींचे योग्य व चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवणे शक्य होईल व उत्पादनातही भरघोस वाढ होईल.
…….. शेतकरी हितार्थ…यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!
—-
🦚🌹🦚 !! अन्नदाता सुखी भव: !!🦚🌹🦚
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो
🙏विचार बदला! जीवन बदलेल!!🙏
Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
Mob No.: 09762064141