गतवर्षी एप्रिलमध्ये सोळा तारखेला उन्हाळ कांद्याची खरेदी सुरू झाली. यंदा एक महिना उलटून गेल्यानंतरही खरेदी सुरू झालेली नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘नाफेड’मार्फत उन्हाळ कांद्याची लवकरच खरेदी सुरू केली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. २०) डॉ. पवार यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी माहिती दिली. यंदा तीन लाख टन खरेदीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी लाल कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेत टिकवण क्षमता कमी असलेल्या लाल कांद्याची ‘नाफेड’मार्फत प्रथमच खरेदी करण्यात आली आहे.
आता उन्हाळ कांदा सुरू झाला असून, नाफेडमार्फत उन्हाळ कांदा खरेदीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. लवकरच खरेदी सुरू होणार आहे. यामुळे बाजार समिती स्पर्धा निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी मदत होईल.
‘नाफेड’ची ओळख ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाली आहे. चाळीस हजार टनांपर्यंत उन्हाळ कांद्याची खरेदी केली जात होती. गेल्या वर्षी अडीच लाख टन खरेदी झाली होती. यंदा तीन लाख टन खरेदी केली जाणार आहे.
नाफेडबरोबर नाफेडच्या सब एजन्सी शेतकरी प्रोड्यूसर कंपनीही बाजार समितीतून कांद्याची खरेदी. करतील यासाठी प्रयत्न केले जाणार. आहेत असेही मंत्री डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ खरेदीची रक्कम लवकरच
दोन महिन्यांपूर्वी ‘नाफेड’मार्फत लाल कांद्याची खरेदी करण्यात आली होती, पण अद्यापही लाल कांद्याचे पैसे अदा करण्यात आलेले नाहीत, पण कागदपत्रांची संबंधित नाफेडच्या सब एजन्सीकडून पूर्तता झाल्यानंतर लवकरच पैसे अदा केले जातील, असा विश्वास माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला.

