Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » सोयाबीन पीक लागवड – सविस्तर माहिती
ताज्या बातम्या

सोयाबीन पीक लागवड – सविस्तर माहिती

Neha SharmaBy Neha SharmaMay 16, 2022No Comments17 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नमस्कार शेतकरी बंधूनो, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या खाद्य तेलाच्या किमतीतील बदल व मागणी पुरवठ्यातील कमतरता यावरुन असे लक्षात येते कि या पुढिल काळात भारताबरोबर इतरही देशांना खाद्य तेल दर वाढीचा सामना करावा लागेल त्या दृष्टीकोनातून तेलवर्गिय पिकांची लागवड करणे फायदेशीर राहिल. त्यामध्ये सोयाबीन, सूर्यफुल, भुईमूग, करड़ई यासारख्या पिकांचा समावेश होतो. सोयाबीन (लॅ. ग्लायसीन मॅक्स किंवा ग्लायसीन सोया). हे वर्षायू, शिंबावर्गीय फॅबेसी किंवा लेग्युमिनोजी कुळातील गळिताचे पीक व खाद्यान्न आहे. सोयाबीन हे जगातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे. ते वनस्पतिजन्य प्रथिनांचा (प्रोटिन्स) व अनेक रासायनिक उत्पादनातील घटकद्रव्यांचा महत्त्वाचा स्रोत आहे. या पिकास जगात अद्भूत कडधान्य (वन्डर बीन्स) म्हटले जाते. जगामध्ये गळीत धान्यामध्ये सोयाबीन लागवड सर्वात जास्त असुन हे भारतातील एक प्रमुख पीक आहे. सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण २०% व प्रथिनांचे प्रमाण ४०% आहे. सोयाबीन हे सर्वांत पोषक आणि सहज पचन होणारे अन्न आहे. तसेच ते प्रथिनांसाठी सर्वोत्कृष्ट व आर्थिक दृष्ट्या स्वस्त असा स्रोत आहे. जवळजवळ सर्व जगभर ते माणसांच्या व प्राण्यांच्या आहारात समाविष्ट केलेले आहे. सोयाबिनातील प्रथिनांमध्ये ॲमिनो अम्लांचे उत्कृष्ट संतुलन असते. मात्र मिथिओनीन आणि सिस्टाइन यांचे प्रमाण कमी असते. सोयाबिनामध्ये स्टार्च नसल्याने ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे.

हवामान :-
सोयाबीन हे पीक उष्णता व पाण्याच्या ताणास संवेदनशील असे पीक आहे. हे पीक २० ते ३५ सेल्शिअस उष्णतामान व ७०० ते १२०० मि. मी. पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात उत्तम येते व सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा देखील पिकावर परीणाम होतो. भरपूर फुलो-यासाठी निदान दहा तासांपेक्षा जास्त काळोख्या रात्री असाव्या लागतात. म्हणून खरीप हंगामात हे पीक चांगले येते. साधारणत: हवामानाच्या वर्गीकरणानुसार कमी पावसाच्या, निश्चित पावसाचा व मध्यम ते भारी पावसाचा प्रदेश असे प्रकार पडतात. सोयाबीन हे हवामानाच्या वर्गीकरणानुसार मध्यम ते उशिरा कालावधीचा वाण टी. ए. एम. एस. ९८-२१ हा जास्त पावसाच्या प्रदेशांत तसेच संरक्षित ओलिताच्या सोय नसल्यास वरील वाणांचे अपेक्षित उत्पादन येत नाही.

सोयाबीन पिकांकरीता लागणारी जमिन :-
१) मध्यम स्वरुपाची
२) भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी
३) उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली
४) चोपण व क्षारपड जमिन वापरू नये
५) पुर्वी सुर्यफुल घेतलेले शेत वापरू नये
६) जमिन मे महिन्यात नांगरट केलेली उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ असावी.
७) जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यत असलेली निवडावी.
८) एकदम हलक्या मुरमाड जमिनी या पिकास योग्य नसतात.

बियाणांची उगवणक्षमता:-
सोयाबीन पिकांच्या बियाणांची उगवणक्षमता ही किमान ७०% किंवा त्यापेक्षा जास्त उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे.

सुधारित जाती :-
भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली दरवर्षी आखिल भारतीय स्तरावर, राष्ट्रीय सोयाबीन अनुसंधान केंद्र, इंदौर अंतर्गत नवनवीन जातींच्या संशोधनाचा आढावा घेत असते. त्यापैकी महाराष्ट्रासाठी ज्या काही महत्वाच्या सुधारीत जाती लागवडीकरीता प्रसारीत करण्यात आलेल्या आहेत त्या जाती व त्यांची गुणवैशिष्ट्ये पूढे दिली आहेत.

सोयाबीन-लागवड :-
जात = परिपक्वतेचा कालावधी (दिवसात) = प्रति हेक्टरी उत्पादन क्विंटल
१) पी. के. -४७२ = ९५ ते १०५ दिवस = २२ ते २८ क्विंटल
२) जे. एस.-३३५ = ९५ ते १०० दिवस = २५ ते ३५ क्विंटल
३) मोनेटा = ७५ ते ८० दिवस = २० ते २२ क्विंटल
४) एम. ए. सी. एस. -१३ = ०० ते ०० दिवस = २५ ते ३५ क्विंटल
५) एम. ए. सी. एस.-५७ = ७५ ते ९० दिवस = २० ते ३० क्विंटल
६) एम. ए. सी. एस. -५८ = ९५ दिवस = २५ ते ३५ क्विंटल
७) एम. ए. सी. एस.-१२४ = ९० ते १०० दिवस = ३० ते ३५ क्विंटल
८) एम. ए. सी. एस.-४५० = साधारणपणे ९० दिवस = २५ ते ३५ क्विंटल
९) टी. ए. एम. एस. -३८ = ९० ते ९५ दिवस = २३ ते २८ क्विंटल
१०) टी. ए. एम. एस.-९८ -२१ = १०० ते १०५ दिवस = २४ ते २८ क्विंटल
या व्यतिरिक्त,
MAUS – 612
– दर्जेदार बियाणे, इतर जातीच्या तुलनेत अधिक एकरी उत्पादन  तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते.

MAUS – 158
– एकरी अधिक उत्पादन देणारे सोयाबीन वाण,काढणी वेळेस शेंगा फुटण्याचे प्रमाण सगळ्यात कमी

MAUS – 162
– सरळ व उंच वाढणारे ,तसेच अधिक एकरी उत्पादन देणारे वाण, काढणी यंत्राने काढण्यासाठी सगळ्यात चांगले वाण

DS- 228 फुले कल्याणी
राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण.
अधिक उत्पादन देण्याची क्षमता असणारे वाण. उशिरा येणारे असून पाण्याची सोय असणाऱ्या ठिकाणी पेरणीसाठी उपयुक्त.

फुले संगम 726
– राहुरी कृषि विद्यापीठाचे आणखीन एक सर्वाधिक एकरी उत्पादन तसेच काढणीच्या वेळेस शेंगा न फुटणारे, रोगास प्रतिबंधक वाण.

JS-9705
– महाराष्ट्रसाठी शिफारस, 70-75 दिवसांत येणारे, तुलनेत अधिक एकरी उत्पादन तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते.

JS-9305
-महाराष्ट्रसाठी शिफारस, अधिक उत्पादनासाठी, रोग व किडीस कमी बळी पडणारे सोयाबीन वाण.

Js 335 या जातीच्या शेंगा जास्त प्रमाणात उकलतात, ही जात बुटकी आहे जास्त वाढत नाही,

MACS 1188 आणि फूले संगम या जाती उंच वाढणारी, जास्त उत्पादन देणारे, अगदी कमी प्रमाणात उकलणारी असे गुणधर्म आहेत या जातीत, उंच वाढणारी असल्याने पाला भरपूर असतो त्यामुळे तो पाला जमीनीवर पडून जमीनीचा सेंद्रिय कर्ब वाढायला पण मदत होते त्यामुळे शेतकरी बांधवांनी या नवीन जाती कराव्यात आणि या जातींची संपूर्ण महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस आहे.

बियाणे :-
सोयाबीनचे सरळ पेरणीसाठी 30 ते 35 किलो प्रति एकरी तर टोकण पेरणीसाठी 20 ते 25 किलो प्रति एकरी बियाणे लागते.

लागवडीपुर्वी बीज प्रक्रिया :–
लागवड करताना प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा थायरम  किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी, त्यानंतर प्रति किलो बियाण्यांस 3 ग्रॅम थायमेथोक्झाम किडींच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम (सोयाबीन गट)जिवाणू संवर्धके आणि २५ ग्रॅम पी.एस.बी. जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सावलीत हलके वाळवून लगेचच पेरणी करावी.

बिजप्रक्रिया करण्याचा क्रम :-
सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर साधारणतः 3 ते 4 तासानंतर किंवा अगोदर केलेली बीजप्रक्रिया व्यवस्थीत सुकून झाल्यानंतर जैविक नत्र पुरवठा करणारया जीवाणू रायझोबियमची बीजप्रक्रिया करावी. सर्वात शेवटी पी.एस.बी ची बीजप्रक्रीया करावी.

बीजप्रक्रियेचे फायदे:-
जमिनीतून अथवा बियाण्यांच्या मार्फत होणारया किड व रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल.
बीजप्रक्रियेमुळे बियाण्यांची उगवण क्षमता वाढते.
पिके / रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होते.
बीजप्रक्रियासाठी कमी खर्च येत असल्याने किड व रोग नियंत्रणाची ही किफायतशीर पद्धत आहे.

लागवड :–
सोयाबीनची लागवड जुन ते जुलै महिन्यात केली जाते. लागवड करतांना पावसाचा अंदाज घेवुन लागवड करावी. पेरणीतील अंतर हे दोन ओळीत ३० ते ४५ से.मी. तर दोन रोपांतील अंतर ५ ते १० सेमी. असावे.

तणनियंत्रण :–
सोयाबीन पिकांत वापरता येणारी तणनाशके, हि तणनाशके वापरतांना कंपनी प्रतिनिधि, कृषी तज्ञ, किंवा दुकानदार यांचा सल्ला घेवुन, रोपांवर फवारणी होणार नाही याची काळजी घेवुन वापरावे.

तणनाशक केव्हा वापरावे :-
तणांच्या बंदोबस्तासाठी उगवणीपूर्व तणनाशक पेंडीमिथॅलीन ३० ई.सी. पेरणीच्या वेळी प्रति एकरी १ ते १.३ लिटर २५० ते ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे. पीक उगवणीनंतर १५ – २० दिवसांनी एक कोळपणी व एक खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर १५-२० दिवसांनी इमिझाथ्यापर ४०० मिली. २०० – २५० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणावर फवारावे.

तण उगवणीनंतर वापरण्याचे तणनाशक :–
१) टरगा = बहुवार्षिक तणांच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस वापरावे लागु शकते.
२) परस्युट (इमिझाथायपर) = तण उगवणीनंतर वापरता येते. तणाच्या वाढीचा काळ सक्रिय हवा.

खत व्यवस्थापन :–
बेसल डोस :- (प्रमाण किलो प्रती एकर)
चांगले कुजलेले शेणखत एकरी १० ते १२ गाड्या वापरावे, प्रति एकरी 30:75:30 कि.ग्रॅ. नत्र : स्फुरद : पालाशची मात्रा पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्यावेळी दुचाडी पाभरीने द्यावी. त्याचप्रमाणे एकरी ८ किलो गंधक, १० किलो झिंक सल्फेट, ४ किलो बोरॅक्सची मात्रा पेरणीपूर्वी द्यावी.
फवारणी डोस :-
पिकांच्या वाढीची अवस्था = फवारणीच्या खतांचा प्रकार = प्रमाण प्रती लिटर पाणी
१) लागवडीनंतर १० – १५ दिवसांत = 19-19-19 = 2.5 – 3 ग्रॅम + सुक्ष्म अन्नद्रव्ये = 2.5 ग्रॅम प्रति लीटर पाणी.
२) वरिल फवारणीनंतर १५ दिवसांनी = 12:61:00 = 4 ग्रॅम + बोरॉन २०% = 1 ग्रॅम + अमिनो असिड सोबत सिविड अर्क असलेले टॉनीक = 2.5 मिली प्रति लीटर पाणी.
३) फुलोरा अवस्थेत = 00-52-34 = 4 ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये (ग्रेड नं २) = 2.5 – 3 ग्रॅम प्रति लीटर पाणी.
४) शेंगा पोसत असतांना = 13-00-45 = 4 ग्रॅम + बोरॉन = 1 ग्रॅम प्रति लीटर पाणी.
५) वरिल फवारणीनंतर ७ दिवसांनी = 00-52-34 = 5 ग्रॅम प्रति लीटर पाणी.

पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था खालील प्रमाणे:
1) पीकाला फांद्या फुटताना म्हणजेच पेरणी नंतर ३० ते ३५ दिवसांनी.
2) पीक फुलोऱ्यात असताना म्हणजेच पेरणी नंतर ४५ ते ५० दिवसांनी.
3) शेंगा भरताना म्हणजेच पेरणी नंतर ६० ते ६५ दिवसांनी.
पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेमध्ये जर पावसाने ताण दिला तर पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळणा-या प्रमुख किडी यामध्ये खोडमाशी, हिरवेउंट अळी, चक्री भुंगेरे, तुड्तुडे, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंटअळी, पाने पोखरणारी अळी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
1) खोडमाशी :– ही सोयाबीन पिकावरील महत्वाची कीड असून जवळजवळ सर्व भारतात या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. खोडमाशीची मादी सोयाबीनच्या पानावरील शीरेजवळ अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर येऊन शीरेतून देठात व देठातून खोडात पोखरत जाते. पिकांच्या सुरवातीच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास रोप मरते. उशिरा प्रादुर्भाव झाल्यास झाडाच्या वाढीवर परिणाम होऊन फुले व शेंगाचे प्रमाण कमी होते.

2) तंबाखुवरील पाने खाणारी अळी :– अनुकुल हवामान मिळाल्यास या किडीचा फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होऊ शकतो. किडीचा मादी पतंग पानाच्या मागील बाजूस पुंजक्याने अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या सुरवातीला समुहाने एकाच झाडाची पाने कुरतडतात. नंतर त्या सर्व शेतात पसरतात. कोवळ्या शेंगा असताना प्रादुर्भाव झाल्यास अळ्या शेंगा कुरतडून आतील दाणे खातात. अशावेळी पिकाचे उत्पादन 70 टक्क्यांपेक्षा जास्त घटते.

3) बिहार सुरवंट :– ही किड भारतात सर्वत्र आढळते. सुरवातीस अळ्या एकाच झाडावर पुंजक्याने राहतात व पानांचे हरीतद्रव्य खाऊन टाकतात. त्यामुळे पाने जाळीदार होतात. त्यानंतर अळ्या सर्व शेतात पसरतात व पुर्ण पाने खातात. किडीच्या अळ्या केसाळ असून प्रथम त्यांचा रंग पिवळा असतो व नंतर तो राखाडी होतो.

4) पाने पोखरणारी अळी :– कमी पाऊस व कोरडे हवामान असल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीच्या अळ्या पानांच्या वरील बाजूस नागमोडी आकारात पाने पोखरत जातात व वाढ पुर्ण झाल्यावर तेथेच कोषावस्थेत जातात. एका पानांवर एकापेक्षा जास्त अळ्यांचा हल्ला झाल्यास पान वाकडे तिकडे द्रोणाकार होते व नंतर सुकून गळून पडते.

5) पाने गुंडाळणारी अळी :– सतत पाऊस व ढगाळ हवामान राहिल्यास या किडीचा उपद्रव वाढतो. किडीची अळी चकचकीत हिरव्या रंगाची असते व हात लावताच लांब उडून पडते. एक किंवा अधिक पाने एकमेकांना जोडून कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.

6) मावा :– ढगाळ व पावसाळी हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. कीड पानांच्या मागील बाजूस व खोडावर राहून रस शोषते. या किडीच्या अंगातून साखरेसारखा चिकट द्रव स्त्रवतो. त्यामुळे झाडावर काळी बुरशी वाढते. सोयाबीनवरील मावा किडीचा रंग पिवळा किंवा हिरवा असतो.

7) शेंगा पोखरणारी अळी :– ही प्रामुख्याने कपाशी, तूर, हरबरा या पिकांवरील कीड असून गेल्या काही वर्षात सोयाबीन पिकांवर जास्त प्रमाणात दिसून येऊ लागली आहे कीडीच्या अळ्या सुरवातीच्या काळात पाने खातात. शेंगा भरण्याच्या काळात शेंगा पोखरून आतील दाणे कुरतडतात.

8) हिरवे तुडतुडे :– या किडीची पिल्ले व पुर्ण वाढ झालेले कीटक पानाच्या मागील बाजूस राहून रस शोषतात. त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात व पाने आकसली जातात.

9) शेंगा पोखरणारी सूक्ष्म अळी :– सांगली, कोल्हापूर या भागात तसेच कर्नाटक राज्यात या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकाच्या दाणे भरण्याच्या काळात किडीची मादी शेंगावर अंडी घालते. किडीच्या अळ्या शेंगा पोखरून आतील दाणे खातात. शेंगा वरून निरोगी दिसतात परंतु अळ्या आतील दाणे खाऊन टाकतात. त्यामुळे किडीचा प्रादुर्भाव ओळखणे अवघड जाते.

10) हिरवा ढेकूण :– ही कीड पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषते. सोयाबीन पिकांच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.

11) हुमणी :– ही अनेक पिकांवर पडणारी कीड असून किडीच्या अळ्या जमिनीत राहून रोपांची मुळे खातात. त्यामुळे पिकाच्या सुरवातीच्या काळात रोपे सुकतात व मरतात. अळीचे कोष सुप्तावस्थेत जमिनीत राहतात. पावसाळ्याच्या सुरवातीस अनुकूल हवामान झाल्यावर भुंगेरे कोषातून बाहेर पडतात. हे भुंगेरे कडुनिंब व बाभळीची पाने खातात व शेणखतात अंडी घालतात. शेणखताद्वारे सर्व शेतात पसरते.
याखेरीज महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर लाल मखमली अळी, उंट अळी, पांढरा भुंगेरा, करदोटा भुंगेरा इत्यादी किडींचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येतो.

12) पांढरी माशी :– ही कीड पानांच्या मागील बाजूस राहून पानांतील रस शोषते. सोयाबीन पिकाच्या विषाणूजन्य रोगांच्या प्रसारास ही कीड मदत करते.

एकात्मिक किड नियंत्रण :–
मशागतीय नैसर्गिक किडनियंत्रण:- 
उन्हाळ्यात जमिनिची खोलवर मशागत नांगरट केल्यास किडींच्या विविध अवस्था उन्हात उघड्या पडून मरून जातात. ज्यावेळी आपण दिवसा नांगरट करत असतो त्यावेळी भरपूर चिमण्या, कावळे, बगळे इत्यादी पक्षी कीटक वेचून खातात त्यामूळे 10 ते 15 टक्के किड नियंत्रण या पद्धतीतून मिळते. यामध्ये हुमणी किड, तंबाखूवरील पाने खाणारी अळी व इतर अळ्या  यांचे मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळते.

भौतिक पद्धती (कामगंध सापळे):- 
एकात्मिक किड व्यवस्थापनात पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी भौतिक उपाय म्हणून कमगंध सापळे उपयुक्त ठरतात. यामध्ये वॉटर ट्रॅप, फनेल ट्रॅप, रक्षक सापळे, प्रकाश सापळे, चिकट सापळे अश्या प्रकारे विविध प्रकारचे सापळे वापरून किड नियंत्रण करणे शक्य आहे.
पाने खाणारी अळी, उंटअळी, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे, मावा आणि नागअळी यासारख्या किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा उपयोग केला जातो.

जैविक किड नियंत्रण:- 
1) पाने खाणारी अळी, उंटअळी, नागअळी या किडींच्या जैविक नियंत्रणासाठी बॅसिलस थुरीनजेनिसिस या जैविक कीटकनाशकाचा वापर करावा.
2) इतर किडींच्या व रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी बिव्हेरिया बसियाना, व्हर्टीसिलियम लेकनी, मेटार्हिझियम अनिसोप्ली या एकत्रित जैविक कीटकनाशकाचा वापर करावा.

रासायनिक किड नियंत्रण:- 
1) खोडमाशीच्या नियंत्रणासाठी थायमेथोक्झाम 30% या किटकनाशकाची 3 ग्रँम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया देखील परिणामकारक आढळून आली आहे. पाने खाणा-या, पाने पोखरणा-या व गुंडाळणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस 25 इ.सी. 1.5 लीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 20 इ.सी. 1.5 लिटर किंवा इथोफेनप्राँक्स 10 इ.सी. 1 लिटर किंवा ट्रायझोफॉस 40 इ.सी. 800 मि.ली किंवा इथिऑन 50 इ.सी. 1.5 लीटर किंवा मेथोमिल 40 एस.पी. 1 किलो या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. वरील कीटकनाशकांचा भुकटीच्या देखील हेक्टरी 20-25 कीलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करावा.
2) रस शोषणा-या किडींच्या नियंत्रणासाठी मिथिल डिमेटाँन (0.03 टक्के) किंवा फॉस्फोमिडाँन (0.03 टक्के) किंवा डायमेथोएट (0.03 टक्के) या किटकनाशकांची फवारणी करावी.
3) हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी शेणखतात ते शेतात पसरण्यापुर्वी 10 टक्के लिंडेन किंवा 2 टक्के मॅलेथिऑन भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळल्यास 60 किलो प्रती हेक्टरी 5 टक्के क्लोरडेन किंवा हेप्टाक्लोर भुकटी जमिनीत मिसळावी. पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजे मे जून महिन्यामध्ये भुंगेरे बाहेर पडल्यावर कडू निंबाच्या व बाभळीच्या झाडावर किटकनाशकांची फवारणी करून ते नष्ट करावेत किंवा लाईट ट्रॅप लावून पकडावे.

महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळणारे प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण :–
1) तांबेरा :– सतत पाऊस व ढगाळ हवामान अशी अनुकूल परिस्थिती राहिल्यास या रोगांचा इतर भागात प्रसार होतो. या रोगांमूळे पानांच्या मागील बाजूस लालसर, तपकीरी रंगाचे पुरळ दिसून येतात. पिकांची वाढ मंदावते व पाने गळतात. उशिरा पेरलेल्या सोयाबिन पिकाचे जास्त नुकसान होत असल्याने या भागातील शेतकरी 15 जुनपुर्वी पेरणी करतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पीक फुलावर असताना हेक्झाकोनँझोल 0.1 टक्के या रसायनांचा फवारा आवश्यक ठरतो.

2) खोडाचा राखी करपा :– पिकाच्या उगवणीनंतर कोरडे व उष्ण हवामान असल्यास यो रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. रोपाची वाढ थांबून रोपे मरतात. खोडाच्या जमिनीलगतच्या भागावर काळ्या रंगाचे चट्टे दिसतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम 3-4 ग्रँम प्रती किलो किंवा कार्बेन्डँझिम 2-2.5 ग्रँम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी. तसेच ट्रायकोडर्मा विरीडी या बुरशीपासून तयार केलेल्या बुरशीनाशकांची बीजप्रक्रीया उपयुक्त ठऱते.

3) करपा :– या रोगाच्या प्रादुर्भाव झालेली रोपे कोलमडून पडतात व मरतात. जमिनीजवळ खोडावर पांढरी बुरशी आढळून येते. शेतातील बुरशीग्रस्त भाग हा रोगाचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरतो. अशा भागाला प्रति हेक्टरी 20 किलो क्लोरबेनच्या द्रावणाने भिजवून प्रक्रीया करावी.

4) सुक्ष्म जिवाणूंचे पुरळ :– रोगजनक जिवाणुमुळे पानावर लालसर तपकीरी रंगाचे फुगलेले ठीपके आढळून येतात. पावसाळी हवामानात रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. या रोगांचे नियंत्रण बीजप्रक्रीयेद्वारे किंवा कार्बोक्झीन (0.2 टक्के) च्या फवारणीने करता येते.

5) पानांवरील ठीपके :– बुरशीच्या निरनिराळ्या रोगजनक प्रजातीमुळे पानांवर पिवळे, लालसर, तपकीरी, बेडकाच्या डोळ्याच्या आकाराचे ठीपके आढळून येतात. बुरशीनाशकांच्या फवारणीने त्यांचे नियंत्रण करता येते. त्यासाठी कार्बेन्डँझिम, डायथेन एम – 45, डायथेन झेड – 78 व ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

6) बियांवरील जांभळे डाग :– पिकांच्या काढणीच्या वेळी सतत पाऊस असल्यास या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. असे रोगग्रस्त बियाणे पेरणीसाठी वापरू नये. तसेच पेरणीपुर्वी बीजप्रक्रीया करावी.

पीक कापणी व मळणी :-
साधारणपणे सोयाबीनची सर्व पाने झडून जातात. तसेच ९५ टक्के शेंगा पक्व झालेल्या असतात तेव्हा पीक कापणी योग्य झाले असे समजावे. परंतू सोयाबीनच्या जास्त कालावधीच्या जातीमध्ये शेंगा जरी पक्व झालेल्या दिसल्या तरी झाडांवर हिरवी पाने दिसून येतात. तसेच १० टक्के शेंगा सुध्दा हिरव्या दिसतात. तेव्हा पीक पक्व झाल्याबरोबर ताबडतोब कापणी सुरू करावी अन्यथा उशीर झाल्यास शेंगा तडकून जातात. व उत्पन्नात घट येवू शकते. मोनॅटो ही जात उशिरा कापणीस फारच संवेदनशील आहे तसेच पी.के.-४५२ या जातीस कापणीस वेळ झाला असल्यास उत्पन्नात ८०-८५ टक्के घट येवू शकते. सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्के असताना या पिकाची कापणी करणे योग्य ठरते. तसेच मळणी करतांना सोयाबीनच्या दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असणे आवश्यक आहे. जर बियांणामधील ओलाव्याचे प्रमाण १३ टक्केपेक्षा कमी असल्यास अशावेळी मळणी करतांना दाण्याची फूट होऊन दाळ होण्याचे प्रमाण वाढते किंवा बियाण्यांच्या वरच्या कवचाला तडा जाऊन उगवणशक्तीचा स झालेला दिसून येतो. मळणीच्या वेळी बियामधील ओलाव्याचे प्रमाण १७ टक्के पेक्षा जास्त असल्यास सुध्दा बियाण्यास हानी पोहचू शकते. तेव्हा सोयाबीनच्या कापणी व मळणीच्या वेळी सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के दरम्यान असणे अत्यावश्यक आहे. जेणे करून सोयाबीनची उगवणशक्ती टिकून राहून गुणवत्ता सुध्दा चांगली राहील.

सोयाबीनची कापणी व मळणी करण्याच्या पध्दती :-
१) हाताने कापणी व मळणी :-
सोयाबीनचे क्षेत्र कमी प्रमाणात असेल किंवा सोयाबिन बियाणे म्हणून उपयोगात आणावयाचे असल्यास हि पध्दत अधिक फायदेशिर ठरते अशा क्षेत्रातील पीक कापून शेतातच ४-५ दिवस सुकवायला सोडुन देऊन नंतर कोरड्या जागेवर किंवा ताडपत्रीवर छोट्या छोट्या गंज्या काडीने कींवा लाकडी दांड्याने ठोकून घ्याव्यात. या क्रियेत बियाला कमी मार लागल्यामूळे सोयाबिनचे फारच कमी नुकसान होते. म्हणून बियाण्याची गुनवत्ता उदा. उगवणशक्ती टीकून ठेवायची झाल्यास हाताणे कापणी व मळणी करणे अत्यावश्यक आहे.

२) हाताने कापणी तथा मळणीयंत्राद्वारे मळणी :-
हाताने कापणी केलेल्या सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असतांना मळणी केल्यास बियाण्याची गुणवत्ता चांगली राहते. परंतू मळणी यंत्राच्या ड्रमच्या फे-याची गती ४०० फेरे प्रति मिनीटपेक्षा जास्त असू नये.

३) कम्बाईनर द्वारे कापणी व मळणी :-
पूर्वी कम्बाईनरव्दारे कापणी मळणी करणे फारसे प्रचलीत नव्हते परंतू आता काही भागात कम्बाईनरव्दारे कापणी व मळणी करण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. कापून ठेवलेल्या सोयाबिनची सुध्दा कम्बाईनरव्दारे मळणी करता येते. परंतू यात सोयाबीन दाळ होतांना दिसून येते. तसेच या सोयाबीनच्या बियाण्यांच्या कवचाला सुध्दा इजा पोहचुन त्याचा उगवणशक्तीवर परिणाम होतो. ज्या ठीकाणी सोयाबीन हे बिजोत्पादणासाठी घ्यावयाचे असेल त्या ठीकाणी कम्बाइनरद्वारे कापणी व मळणी करु नये. कम्बाईनरव्दारे कापणी मळणी केल्यास ८-१० टक्के बियाण्याची घट येऊ शकते.
कापणी मळणी झल्यावर सोयाबीनचे बियाणे उफणून, चांगले साफ करून व सुकवून मगच साठवावे. बियाणे सुकवितांना सोयाबीन मधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जास्त ओलावा असल्यास बुरशीची वाढ होवून बियाण्याच्या प्रतीवर परीणाम होतो त्यासाठी वाढ होवून बियाण्याच्या प्रतिवर परीणाम होतो, त्यासाठी साठवणू आधी बियाणे सुकविणे अत्यांवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सोयाबीन खळ्यावर किंवा ताडपत्रीवर ३-४ दिवस सुकवून घेतात. रात्री बियाणे झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी.
बियाणे म्हणून सोयाबीन तयार कराचे झाल्यास १०-१२ टक्के ओलाव्याचे प्रमाण असलेले सोयाबिन हे मशीनद्वारे वेगवेगळ्या चाळण्यातून तसेच पृथकाद्वारे वेगळे करून पिशव्या मध्ये साठवावे .

साठवणूक :-
सोयाबीनची साठवणूक करतेवेळी खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
साठवणूक करतेवेळी लाकडी फळ्या टाकून त्यावर पोते ठेवावे जेणेकरून खालची ओल सोयाबीनला लागणार नाही.
पोत्याच्या चारही बाजूने हवा खेळती राहिल अशा रीतीने पोते ठेवावे.
एकावर एक अशी पोत्याची थप्पि न लावता दोन पोत्यावर एक अशी पोत्याची थप्पी लावावी. ५ पोत्यापेक्षा जास्त पोत्याची थप्पी लावू नये.
आवश्यकतेनूसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास किटक नाशकाची फवारणी करावी.
अशा प्रकारे सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन केल्यास सोयाबीनचे २०-२५ क्विं. / हे. उत्पन्न मिळू शकते.

सोयाबीन पिकाच्या अधिक उत्पादनासाठी महत्वाचे मुद्दे :-
१) धुळ पेरणी करू नये.
२) सुपिक, मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.
३) सेंद्रिय, रासायनिक व जिवाणू खतांचे शिफारसीनूसार एकात्मिक खत व्यवस्थापन करावे. नत्रयुक्त खतांचा प्रमाणबध्द वापर करावा.
४) पेरणी वेळेवर म्हणजेच १० जून ते १५ जुलै पर्यतच करावी.
५) रोग व किड व्यवस्थापनाच्या दृष्टिने पिकांचा फेरपालट करावा.
६) पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ति घरच्याघरी तपासून घ्यावी.
७) शेतक-यांनी स्वत:चे बियाणे स्वत: तयार करावे.
८) पेरणीपूर्व बियाण्यास बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करून त्यानंतर जिवाणू संवर्धक लावावे.
९) बियाणे ४ सेंमी.पेक्षा जास्त खोल पेरू नये.
१०) उताराला आडवी तसेच पूर्व- पश्चिमी पेरणी करावी.
११) पेरणीसाठी आवश्यकतेपेक्षा दुप्पट बियाणे स्वत: जवळ असल्यास दुबार पेरणीची व्यवस्था करता येवू शकते.
१२) पीक फुलो-यावर येईपर्यत तणमुक्त ठेवावे. पीक फुलो-यावर असतांना किंवा त्यानंतर डवरणी करू नये.
१३) दुस-या डवरणीच्यावेळी डव-याला दोरी बांधावी जेणेकरून स-या तयार होतील, त्यामुळे मुलस्थानी जल व मृदसंधारण साधता येईल.
१४) ज्या शेतात पाण्याचा निचरा होत नसेल अशा जमिनीत ५ क्विंटल/ हेक्टर जिप्सम पूर्व मशागतीच्यावेळी मिसळून द्यावे.
१५) चूनखडीयुक्त शेतामध्ये ( सामू ८.० पेक्षा जास्त ) सोयाबीनच्या पीकास फेरस सल्फेट ०.५ टक्के ( ५० ग्रॅम ) + २५ टक्के ( २५ ग्रॅम ) कळीचा चूना १० लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा फवारणी करावी. पहिली फवारणी पिक फुलो-यावर असतांना व दुसरी फवारणी शेंगा धरण्याच्या अवस्थेत करावी.
१६) किडीची आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावरच शिफारसीनूसार एकीकृत किड व्यवस्थापनाचा अवलंब करावा.
१७) मुळ कुजव्या रोगाचे प्रमाण दर वर्षी वाढत आहे याकरीता ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे जैविक बुरशीनाशक २.५ किलो + ५० किलो शेणखत मिसळून घ्यावे.
१८) पीक फुलो-यावर असतांना व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना पाण्याचा ताण पडल्यास व ओलीची सोय उपलब्ध असल्यास क्षेत्र संरक्षित ओलीत द्या.
१९) मळणी करतांना ड्रमची गती ३००-४०० फेरे प्रति मिनिट या दरम्यान असावी. म्हणजे चांगली उगवणशक्ती असलेले बियाणे उपलब्ध होईल.
२०) सोयाबीन हे पीक तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे शक्यतोवर रबी हंगामात सोयाबीन घेवू नये.
…….. यापुढे “अद्यावत शेती म्हणजे विपणनाभिमुख शेती होय”…!!!✍

लेखक परिचय:- Mr.SATISH BHOSALE
(Founder & CEO),
Krushiwala Farmer’s Group.
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141

DevAmrut Agrotech Pvt Ltd. Krushiwala Farmer's Group. SATISH BHOSALE Soybean Crop Cultivation - Detailed Information एकात्मिक किड नियंत्रण :– खोडमाशी पांढरी माशी महाराष्ट्रात सोयाबीन पिकावर आढळणारे प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण :– शेंगा पोखरणारी सूक्ष्म अळी सोयाबीनची कापणी व मळणी करण्याच्या पध्दती :- हुमणी
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.