देशात गेल्या काही दिवसांपासून जनावरांमध्ये लंपी त्वचा रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. तसेच आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण महाराष्ट्रामधील 3 हजार गावांमध्ये लंपी विषाणूचा फैलाव झाल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 1,43,089 गुरांना लंपी रोगाची लागण झाली आहे, त्यापैकी 93,166 योग्य उपचारानंतर बरे झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांतील 3,030 गावांमध्ये आतापर्यंत हा आजार पसरला आहे.
सिंह म्हणाले, राज्यात बाधित गुरांवर उपचार केले जात असून बुधवारपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये १४०.९७ लसी उपलब्ध झाल्या आहेत. लंपी रोग रोखण्यासाठी महाराष्ट्रात आतापर्यंत 135.58 लाख गुरांचे मोफत लसीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचवेळी या आजाराने राज्यात आतापर्यंत २१०० हून अधिक गुरांचा मृत्यू झाला आहे.
पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशीम, जालना, नंदुरबार आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.