कापसाची प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सध्या कापसाला सरासरी ७३०० पासून ८१०० पर्यंत प्रति क्विंटल दर मिळत आहे. सध्या बाजारात दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री (Sale of Cotton) कमी केली आहे. त्यामुळे येथील बाजारातील आवक सरासरी १८०० ते २००० क्विंटलदरम्यान होत आहे. दर उंचावल्यास जानेवारीमध्ये ही आवक वाढू शकते, असा अंदाज आहे.
या महिन्यात सलग नऊ दिवस बाजार समितीतील कापूस खरेदी-विक्री बंद होती. त्यानंतर १५ डिसेंबरपासून हा बाजार सुरू झाला. बाजार सुरू झाल्यानंतर दर मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र उलटेच घडत आहे. गेल्या हंगामात या बाजार समितीत कापसाला दहा हजारांवर भाव मिळाला होता. यंदाही सुरुवात चांगली झाली होती. मात्र आता बाजार समितीत आठवडाभरापासून कापसाचा दर दबावात आलेला आहे.
सरासरी सात हजार ते आठ हजारादरम्यान कापूस विकत आहे. दर कमी झाल्यामुळे शेतकरी कापूस विकण्याऐवजी साठवण्यास पसंती देत आहे. प्रामुख्याने कोरडवाहू पट्ट्यातील कापूस आवक वाढलेली नाही. हा शेतकरी दर वाढण्याच्या प्रतीक्षेत आहे. सध्या कापसाचा बाजार थंडावला आहे. सध्या कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. प्री-मॉन्सून कापूस हंगामाला पावसाचा फटका बसला होता.