नाफेडने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात हमीभावाने हरभरा खरेदी सुरु केली. पण सध्या हरभरा खरेदीची गती कमी आहे. नाफेडने या चार राज्यांमध्ये आतापर्यंत १ लाख १२ हजार टन हरभरा खरेदी केला.
यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४० हजार ७०० टन हरभरा खरेदी करण्यात आला. महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड झाली. देशातील एकूण हरभरा लागवड क्षेत्रापैकी तब्बल २६ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळं यंदा राज्यात चांगली खरेदी होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत आंध्र प्रेदशात ३१ हजार टन आणि गुजरातमध्ये २५ हजार टन हरभऱ्याची खरेदी झाली. तर कर्नाटकात नाफेडने १६ हजार टन हरभरा खरेदी केला. देशातील बाजारात हरभरा आवक आता वाढत आहे. त्या तुलनेत नाफेडची खेरदी धिम्या गतीने सुरु झाली.
इतर राज्यांमध्ये अद्याप खेरदी सुरु झाली नाही. देशात यंदा विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज सरकारनं व्यक्त केला. पण वाढती उष्णता आणि पावसामुळे पिकाला फटका बसला. सरकारनं यंदा हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला.
पण सध्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार ६०० ते ५ हजार रुपये भाव मिळतोय. नाफेडची खरेदी वाढल्यानंतर आणि प्रतिकूल हवामानामुळे हरभरा पिकाला किती फटका बसला, हे स्पष्ट झाल्यानंतर दर वाढू शकतात. व्यापारी आणि अभ्यासकांनी ही माहिती दिली.