राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसाचे तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सियसच्या दरम्यान असून उन्हाच्या झळा पुन्हा वाढल्या आहेत.
तर दुसरीकडे राज्यातील विविध भागांत पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.
पुढील तीन दिवस म्हणजे ३०, ३१ मार्च व १ एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिला आहे.
हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज प्रसिद्ध केला आहे.
विदर्भात गुरुवारी (ता. ३०) ३० ते ४० प्रतितास किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तर पुढील पाच दिवस मराठवाड्यात कोरडे हवामान राहील.
तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ३० व ३१ मार्च रोजी हलका पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात मागील दोन आठवड्यांपासून वादळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, रब्बी ज्वारी या पिकांसह फळबागा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
मराठवाड्यापासून, तेलंगणा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडू पर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाले आहेत.
पूर्व बिहार पासून दक्षिण छत्तीसगडपर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. (Weather Forecast)
तसेच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
परिणामी पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने उद्यापासून (ता. ३०) विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरीत राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे 34.6 (13.6), जळगाव 35.7 (19.5), धुळे 34.5 (15.8), कोल्हापूर 35.6 (18.7), महाबळेश्वरr 29.9 (13.8), नाशिक 31.7 (16.6), निफाड 33.2 (10.5), सांगली 35.7 (17.1), सातारा 35.2 (13.6), सोलापूर 37.0 (20.9), रत्नागिरी 31.1 (20.7), छत्रपती संभाजीनगर 34.3 (18.2), नांदेड 37.6 (20.8), परभणी 37.5 (20.4), अकोला 38.3 (18.6), अमरावती 38.0 (18.1), बुलडाणा 34.0 (20.6), चंद्रपूर 30.2 (21.8), गडचिरोली 35.4 (19.0), गोंदिया 36.0 (19.6), नागपूर 35.8 (20.2), वर्धा 38.6 (21.5), वाशिम 35.4 (20.0), यवतमाळ 38.0 (18.0)havaman andaj