कोल्हापूर : गेल्या वर्षीचा ऊस हंगाम जून महिन्यापर्यंत लाबल्याने यंदा सरकारने एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याबाबत नियोजन सुरू केले आहे. सध्या राज्यभर सुरू असणारा वादळी पाऊस सरकारच्या या प्रयत्नाला खीळ घालण्याची शक्यता आहे. विशेष करून ऊस पट्ट्यामध्ये सातत्याने जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडूनही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचे आव्हान आहे.
विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात दसरा ते दिवाळी या दरम्यानच ऊस हंगाम सुरू होईल, अशी शक्यता आहे. राज्यात यंदा १४ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाची तोडणी झाली होती. यामुळे जवळ जवळ गेल्या वर्षीसारखी स्थिती राज्यभर आहे. यामुळेच राज्य शासनाने नियोजनाचा भाग म्हणून एक ऑक्टोबरपासून ऊसतोडणी सुरू करण्याचे ठरवले आहे.
या बाबत प्रशासन पातळीवरून तयारीही सुरू केली आहे. या महिन्यात हंगाम सुरू करण्यास पावसाबरोबरच ऊस पिकाची अपरिपक्वता ही महत्त्वाची बाब ठरते. यामुळे या महिन्यात शक्यतो करून कारखाने हंगाम सुरू करण्यास फारसे तयार नसतात. ऊस पट्ट्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनांचे वर्चस्व असल्याने या संघटनांच्या ऊस परिषदाही आहेत. हंगामाच्या प्रारंभासाठी त्या ही महत्त्वाच्या ठरतात. एकंदरीत परिस्थितीचा विचार केल्यास दसऱ्यानंतरच गाळप हंगाम सुरू होईल, असे कारखाना प्रतिनिधींचे मत आहे.
राज्य सरकारने जरी नियोजन केले असले तरी मजुरांची उपलब्धता, पाऊस, तांत्रिक बाबी याचा विचार करता दसरा ते दिवाळी दरम्यानच हंगाम सुरू होऊ शकतो, अशी माहिती कारखाना सूत्रांनी दिली. साखर आयुक्तालयाने गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची सूचना केली आहे. तथापि, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील समिती सप्टेंबरच्या मध्यापर्यंत यावर निर्णय घेईल, असा अंदाज आहे.
सध्या राज्यभरात वादळी पाऊस सुरू आहे. ऑक्टोबरपासून ऊस हंगाम सुरू झाल्यास या पावसाचा ऊसतोडणीचा अडथळा येऊ शकतो. पावसामुळे ऊसतोडणी ठप्प झाल्यास कारखान्यांना नाइलाजाने रस्त्यावर असणारा अपरिपक्व ऊस तोडून कारखाना सुरू ठेवावा लागतो. यामुळे साखरेचा उताराही कमी होतो. नुकसान होत असल्याने कारखाने लवकर ऊस तोडणी करण्यास फारसे उत्सुक नसतात. सध्याचे पावसाळी हवामान पाहिल्यास हीच शक्यता अधिक असल्याचे एका कारखाना प्रतिनिधी सांगितले.
💠यंदाच्या ऊस हंगामाचा अंदाज
- एकूण ऊस उत्पादन : १४१३ लाख टन (हेक्टरी ९५ टन प्रमाणे)
- साखर उतारा ११.२० प्रमाणे साखर उत्पादन : १५० लाख टन
- इथेनॉल करता डायव्हर्ट होणारी साखर : १२ लाख टन
- इथेनॉल वगळता तयार होणारी साखर : १३८ लाख टन
साभार :मराठी टेक न्यूज